चंद्रकांत पाटील यांनी घेतली अमित शहांची भेट, राज्यातील आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खलबतं?

मुंबई – भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी नवी दिल्ली येथे केंद्रीय गृहमंत्री तसेच भाजपाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीत पाटील यांनी भाजपच्या राज्यातील संघटनात्मक कामाची माहिती दिली आणि त्यांचे मार्गदर्शन घेतले. राज्याच्या सहकार क्षेत्रातील विशेषतः साखर उद्योगातील महत्वाच्या विषयांबाबतही पाटील यांनी अमित शाह यांना माहिती दिली. राज्यातील सद्यस्थितीबाबत उभय नेत्यांची चर्चा झाली.

चंद्रकांत पाटील यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन अमित शहा यांना भेट दिल्याची माहिती दिली आहे. महाराष्ट्रात आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. त्यामुळे निवडणुकांच्या तयारी बाबतही दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच राज्यातील महापालिका निवडणुकींची लवकरच घोषणा होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, ठाणे, उल्हासनगर, भिवंडी-निजामपूर, पनवेल, मिरा-भाईंदर, सोलापूर, नाशिक, मालेगाव, परभणी, नांदेड-वाघाळा, लातूर, अमरावती, अकोला, नागपूर आणि चंद्रपूर या महापालिकांच्या निवडणुका आगामी वर्षात होणार आहेत. परंतु यामध्ये मुंबई, पुणे, औरंगाबाद, कल्याण-डोंबिवली यांसारख्या अनेक शहरांचा समावेश आहे. त्यामुळे ही निवडणूक भाजपच्या दृष्टीकोनातून महत्त्वाची समजली जात आहे. कारण या निवडणुका पुढील येणाऱ्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकींसाठी महत्त्वाच्या ठरणार आहेत. त्यासाठी या दोन बड्या नेत्यांमध्ये खलबतं सुरू असल्याची चिन्हं दिसत आहेत.


हेही वाचा: मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील शहीद वीरांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिवादन