विधान परिषदेत पंकजा मुंडेना डावललं; आता चंद्रकांत पाटील म्हणतात…

पंकजा मुंडे यांना विधानपरिषदेत स्थान देण्यात न आल्याने त्यांच्या समर्थकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, पंकजा मुंडे यांना उमेदवारी देण्याकरता आम्ही खूप प्रयत्न केले, अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली.

bjp chandrakant patil speck on shiv sena eknath shinde revolt and maharashtra political crisis

राज्यसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच राज्यात आता विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपने नावं जाहिर केली आहेत. यामध्ये सदाभाऊ खोत (Sadabhau Khot)यांच्यासह पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना डावललं गेलं आहे. पंकजा मुंडे यांना विधानपरिषदेत स्थान देण्यात न आल्याने त्यांच्या समर्थकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, पंकजा मुंडे यांना उमेदवारी देण्याकरता आम्ही खूप प्रयत्न केले, अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. (Chandrakant Patil on vidhan parishad Candidacy of pankaja munde)

हेही वाचा – विधान परिषदेसाठी भाजपकडून 5 नावं निश्चित, पंकजा मुंडे आणि चित्रा वाघ यांना डावललं

“भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा (JP Nadda) यांनी विधानपरिषदेसाठी भाजपचे ५ उमेदवार घोषित केले आहेत. यामध्ये विरोधी पक्षेनेते प्रविण दरेकर (Pravin Darekar), राम शिंदे (Ram Shinde), श्रीकांत भारतीय (Shrikant Bhartiya), उमा खापरे (Uma Khapare) आणि प्रसाद लाड (Prasad Lad) यांचा समावेश आहे. आमच्या पक्षामध्ये आम्ही कोरी पाकिटे असतो त्यावर जो पत्ता लिहिला जातो तेथे आम्ही जातो. त्यामुळे राजकारणामध्ये काम करणाऱ्या व्यक्तीच्या कार्यकर्त्याने इच्छा व्यक्त करायची असते. पण निर्णय संघटना घेते”, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

पुढे ते नाराज असलेल्या कार्यकर्त्यांविषयी म्हणाले की, ‘भाजपातील नाराजी ही पाण्यातील नाराजी असते. जहाजाला क्रेनने उचलल्यानंतर जो खड्डा पडतो, तो जसा लगेच भरून निघतो, तशी ही नाराजी आहे.’

ते पुढे म्हणाले की, “केंद्रीय संघटनेने घेतलेला निर्णय हा शिस्तबद्ध कार्यकर्ता म्हणून सर्वांनी मान्य करायचा असतो. पंकजा मुंडे यांच्या नावासाठी देवेंद्र फडणवीस आणि आम्ही सगळ्यांनी खूप प्रयत्न केले होते. पण केंद्रीय संघटनेने त्यांच्याबाबत काही भविष्यातील विचार केला असेल. कार्यकर्त्यांची नाराजी क्षणभराची असते.”

पंकजा मुंडे या मध्य प्रदेश भाजपाच्या सहप्रभारी आहेत. मध्य प्रदेश हे मोठं राज्य आहे. त्यांच्यासाठी आणखी काही जबाबदारी केंद्रीय नेतृत्वाच्या कल्पनेमध्ये असेल, असंही स्पष्टीकरण चंद्रकांत पाटील यांनी दिलं.

दरम्यान, घटकपक्षातील नेत्यांनाही भाजपने ठेंगा दाखवला आहे. त्यावरूनही भाजपवर टीका केली जातेय. शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे (Vinayak Mete) तसेच रयत क्रांती संघटनेचे सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांचाही पत्ता भाजपाने कट केला आहे. त्यावरून बोलताना पाटील म्हणाले की, घटक पक्षांना पार्टीत योग्य स्थान आहे. शेवटी न्याय देत असताना कोणावर तरी अन्याय होत असतो. त्यामुळे घटक पक्षांना बाजूला ठेवण्याचा कोणताही उद्देश नाही.