घरताज्या घडामोडीसंघटनात्मक कार्यासह विकासकामांसाठी दिल्ली दौरा उपयुक्त, चंद्रकांत पाटील यांचा खुलासा

संघटनात्मक कार्यासह विकासकामांसाठी दिल्ली दौरा उपयुक्त, चंद्रकांत पाटील यांचा खुलासा

Subscribe

महाराष्ट्रच्या नेत्यांचे शिष्टमंडळ पक्षाच्या पूर्वनियोजित योजनेनुसार आपल्या नेतृत्वाखाली तीन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर गेले.

राज्यातील भाजप नेत्यांच्या दिल्ली दौऱ्यात पक्ष संघटनेत मोठे बदल करण्याची कोणतीही चर्चा झाली नाही,असा खुलासा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी केला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबत झालेल्या भेटीची माहिती आपण केंद्रीय नेतृत्वाला दिली. ठाकरे यांच्यासोबतची भेट ही भूमिका समजून घेण्यासाठी होती. त्यामध्ये दोन्ही पक्षांच्या युतीचा प्रस्ताव नव्हता असे आपण केंद्रीय नेतृत्वाला सांगितल्याची माहितीही पाटील यांनी दिली.

चंद्रकांत पाटील यांच्यासह विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर आदींनी नुकतीच दिल्लीत जाऊन केंद्रीय मंत्री आणि पक्षाच्या नेत्यांची भेट घेतली. या भेटीगाठींमुळे प्रदेश भाजपच्या नेतृत्वात बदल होणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. आज पत्रकार परिषद घेऊन पाटील यांनी या चर्चेचे खंडन केले.

- Advertisement -

महाराष्ट्रच्या नेत्यांचे शिष्टमंडळ पक्षाच्या पूर्वनियोजित योजनेनुसार आपल्या नेतृत्वाखाली तीन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर गेले. त्यांनी राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा, राष्ट्रीय संघटनमंत्री संतोष यांच्यासह भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांशी सविस्तर चर्चा केली. राज्यातील संघटनात्मक कार्य आणि विकासकामांच्या दृष्टीने हा दौरा अत्यंत उपयुक्त ठऱला, असे पाटील यांनी सांगितले.

दरवर्षी संसदेच्या एका अधिवेशनात राज्यातील भाजप नेत्यांनी दिल्लीत जावे आणि पक्षाच्या खासदारांशी राज्यातील प्रश्नांच्या पाठपुराव्याबाबत विचारविनिमय करावा, अशी पक्षाची परंपरा आहे. कोरोनामुळे ही परंपरा खंडीत झाली होती. आता पुन्हा त्या पद्धतीने आपल्या नेतृत्वाखाली प्रदेश संघटनेतील निवडक नेत्यांचे शिष्टमंडळ तीन दिवस दिल्ली भेटीवर गेले होते. या भेटीत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व संघटनमंत्र्यांना भेटण्यासोबतच राज्यातील नवनियुक्त केंद्रीय मंत्री तसेच ज्येष्ठ मंत्र्यांची भेट झाली. या भेटीतील विचारविनिमयातून राज्यातील विकासकामांच्या दृष्टीने बरीच उपयुक्त माहिती मिळाली. आता नियमितपणे पक्षाचे राज्यातील पदाधिकारी दिल्लीत जाऊन राज्याच्या प्रश्नांबाबत पाठपुरावा करतील, असे पाटील म्हणाले.

- Advertisement -

आपल्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ हे केवळ संघटनात्मक आणि विकासकामांच्या दृष्टीने चर्चा करण्यासाठी गेले होते. राज्यात पक्षामध्ये संघटनात्मक बदल करण्याचा विषय नव्हता. संघटनात्मक पदांसाठी लॉबिंगच्या बातम्या निराधार आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -