भर पावसात निवडणुका नकोत – चंद्रकांत पाटील

Chandrakant Patil

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वात भाजपचं शिष्टमंडळ राज्य निवडणूक आयोग्याच्या भेटीला गेलं होतं. यावेळी भाजपच्या शिष्टमंडळाने निवडणूक आयोगाचे प्रमुख मदान यांची भेट घेतली. यावेळी भर पावसात निवडणुका नकोत, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

चंद्रकांत पाटील यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, १९ आणि २१ तारखेला संपूर्ण कराड शहर पाण्याखाली होतं. त्यामुळे सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाच्या अधिन राहून पावसामुळे या निवडणुका पुढे ढकला. यामध्ये आमचा एक सामाजिक हेतू आहे. जर या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आणि तेवढ्यात जर ओबीसीचं आरक्षण मिळालं तर ओबीसीसह या निवडणुका होतील. अन्यथा पुढील पाच वर्ष त्या ९२ ठिकाणी ओबीसीला प्रतिनिधित्व राहणार नाही. मात्र, ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घ्या, असं सुप्रीम कोर्टाने सांगितल्यानंतर तुम्ही लगेच कामाला लागलात. त्याचप्रमाणे प्रभाग आणि यादी सुद्धा ठरवण्यात आली, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

महाराष्ट्रात दोन दिवसांपूर्वी अचानक निवडणूक आयोगाने ९२ नगरपालिका आणि ४ नगर पंचायतीच्या निवडणुका लावल्या. निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय होऊ नये, अशी जरी आमची भूमिका असली तरीही सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयानुसार त्यांनाही तसंच वागावं लागेल. पण सुप्रीम कोर्टात एक मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. प्रचंड पाऊस मागील काही वर्ष महाराष्ट्रात असतो. त्यामुळे पावसाचे दिवस किमान टाळले जावेत. तसं न होता अचानकपणे या निवडणुका जाहीर करण्यात आल्या. त्यामुळे आम्ही ९२ नगरपालिका आणि ४ नगर पंचायतीच्या प्रतिनिधींना घेऊन आज निवडणूक आयोगाचे प्रमुख मदान यांना भेटलो, असं पाटील म्हणाले.

ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेणे म्हणजे बहुसंख्य ओबीसी समाजावर घोर अन्याय आहे. म्हणून आरक्षणाशिवाय निवडणुका घेऊ नयेत, अशा भूमिकेवर राष्ट्रवादी काँग्रेस ठाम आहे. ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात न्यायालयीन निर्णयाच्या प्रतीक्षेत आपण सर्वचजण आहोत. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सनदशीर मार्गाने सर्व प्रयत्न केले आहेत व यापुढेही करत राहू, असे आश्वासनही जयंत पाटील यांनी दिले आहे.


हेही वाचा : स्थानिक निवडणुकांमध्ये २७ टक्के उमेदवार ओबीसी समाजाचे देणार, जयंत पाटलांची माहिती