मंत्रालयात दारुच्या बाटल्या सापडतात हे प्रकरणं गंभीर, चंद्रकांत पाटील यांची कारवाईची मागणी

नव्या तसेच जुन्या मंत्र्यांच्या भेटीगाठी घेऊन त्यांना देण्यात आलेल्या खात्याबाबत माहिती समजून घेण्याबाबत चर्चा करावी यामुळे राज्यातील नेते दिल्लीत गेले होते.

Chandrakant Patil

मंत्रालयात दारुच्या बाटल्या सापडल्यामुळे राज्यभरात एकच खळबळ माजली आहे. सुरक्षा रक्षकांच्या पहारा आणि तपासणीनंतर सामान्य माणूस मंत्रालयात पोहचतो. यामुळे सामान्य माणसाला सहज प्रवेश नसताना मोठ्या प्रमाणात दारुच्या बाटल्या कशा गेल्या असा प्रश्न उपस्थित झाला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे या प्रकरणी कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. मंत्रालयात दारुच्या बाटल्या सापडतात हे प्रकरण गंभीर असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. तसेच दिल्लीत संघटानत्मक चर्चा झाली असल्याची माहिती दिली आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी म्हटलंय की, मंत्रालयात दारुच्या बाटल्या सापडतात हे प्रकरण गंभीर आहे. याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गंभीर दखल घेतली पाहिजे. कारवाई झाली पाहिजे. मंत्रालयात दारुच्या बाटल्या कशा पोहचतात. राज्यात रेशनची दुकाने बंद ठेऊन दारुची दुकान केवळ महसूल गोळा करण्यासाठी चालू ठेवली यातून कल्चरची वाट लावून टाकली आहे. संत महंतांच्या महाराष्ट्रामध्ये मंदिरांपेक्षा दारुच्या दुकानांना महत्त्व प्राप्त झालं असल्याचा खोचक टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे.

दिल्ली दौऱ्यामध्ये संघटनात्मक चर्चा

भाजप नेत्यांच्या दिल्ली दौऱ्याबाबत चंद्रकांत पाटील यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. अधिवेशनाच्या काळात सगळ्या खासदारांना कोणातरी एका वरिष्ठ खासादाराच्या घरी जेवणासाठी बोलवायचं यामागे हेतू हाच होता की, त्या निमित्ताने सगळे खासदार आणि नेते एकत्र येतात आणि महाराष्ट्रातील संघटनात्मक कामांवर चर्चा होते. कोविडच्या काळात हा कार्यक्रम झाला नाही. आता कोरोना आटोक्यात आला असल्यामुळे थोडं कार्यक्रम सुरु झाले आहेत. यामुळे असा प्रस्ताव आला की, राज्यातील नेत्यांनी दिल्लीत जावं आणि नव्या तसेच जुन्या मंत्र्यांच्या भेटीगाठी घेऊन त्यांना देण्यात आलेल्या खात्याबाबत माहिती समजून घेण्याबाबत चर्चा करावी यामुळे राज्यातील नेते दिल्लीत गेले होते. सगळ्या नेत्यांच्या भेटी घेऊन माहिती घेतली अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.

मोदी- शाह यांची भेट झाली नाही

भाजप अध्यक्ष जे.पी.नड्डा यांची लोकसभेत भेट झाली. दिल्लीत सगळ्या नेत्यांची भेट झाली. या कार्यक्रमांना मोठं रुप प्राप्त झालं आणि राज्यात चर्चांना उधाण आलं आहे. या दौऱ्यामध्ये दोन नेत्यांची भेट झाली नाही. ते म्हणजे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट झाली आहे. त्यांच्याकडे आमचं काम नव्हते यामुळे त्यांची भेट झाली नाही. १५ दिवस पुर्वी सगळ्यांना पत्र गेली आणि भेटीच्या वेळा घेतल्या होत्या अचानक दौरे झाले नाहीत. मात्र या भेटीमध्ये पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांच्यी भेटीचा आग्रह धरला नव्हता कारण त्यांच्याकडे काही काम नव्हते असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

मनसेबाबत नाराजी नाही.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीमुळे जर केंद्रातून काही संदेश द्यायचा असता तर संघटनात्मक प्रमुख जगतप्रकाश नड्डा यांनी भेट नाकारली असती. संसदेत इन्शुरन्स बिल सोडून जगतप्रकाश नड्डा यांनी आम्हाला भेट दिली होती. यावेळी त्यांच्यासोबत तासभर चर्चा झाली. नड्डा दोन दिवस लखनऊला होते तरी त्यांनी दिल्लीत येऊन आम्हाला भेट दिली. यामुळे जर काही संदेश द्यायचा असता तर ते भेटलेच नसते असेही स्पष्टीकरण चंद्रकांत पाटील यांनी दिलं आहे.

दरेकरांचे मुख्यमंत्र्यांना पत्र 

मंत्रालयात आढळून आलेल्या दारूच्या बाटल्यांबाबत उच्चस्तरीय चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याबाबत अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. दरेकर यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून कारवाई करण्याची मागणी केली आहे.