Friday, June 2, 2023
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र फडणवीस-ठाकरेंच्या भेटीवरून चंद्रकांत पाटलांचे सूचक वक्तव्य, म्हणाले...

फडणवीस-ठाकरेंच्या भेटीवरून चंद्रकांत पाटलांचे सूचक वक्तव्य, म्हणाले…

Subscribe

अर्थसंकल्पीय अधिवेशन संपले असले तरी चर्चा होत आहे ती विधिमंडळात झालेल्या उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीची. पण त्यांच्या या अचानक झालेल्या भेटीबद्दल भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सूचक वक्तव्य केले आहे.

भाजपने २०२२ मध्ये शिवसेनेतील प्रभावी नेते आणि सध्याचे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना गळाला लावून राज्यात मोठा राजकीय भूकंप घडवून आणला. ज्यामुळे एकाच वेळेस शिवसेनेला मोठे खिंडार पडले आणि आज सद्यस्थितीला शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह या दोन्ही महत्वाच्या गोष्टी शिंदे गटाला मिळाल्या आहेत आणि त्याचमुळे शिंदे गट हाच खरी शिवसेना म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. पण या सगळ्या राजकीय भूकंपामुळे देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यामधील मैत्रीचे नाते संपुष्टात आले, असे बोलले जात होते. पण आता या चर्चांना देखील पुर्णविराम लागला आहे.

अर्थसंकल्पीय अधिवेशनात गुरूवारी (ता. 23 मार्च) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे दोघेही समोरासमोर आले. यावेळी दोघांनी सुद्धा एकमेकांशी हसत बऱ्याच वेळ गप्पा देखील मारल्या. पण यामुळे राज्याच्या राजकारणात वेगवेगळ्या चर्चा रंगू लागल्या. यावर अनेक राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. याबाबत भाजप मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे.

- Advertisement -

याबद्दल बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, “उद्धव ठाकरे आणि फडणवीस परत एकत्र येण्याच्या कुठेही चर्चा नाहीत. बंद खोलीत पण चर्चा नाही आणि ओपन गार्डनमध्ये पण नाही, सुतावरून काही परीक्षण केलं जातंय, असा काही चान्स नाहीत, पण राजकारणात कुठल्याही पहाटे काहीही होऊ शकत.” तसेच त्यांनी आज मालेगाव येथे होणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या सभेसाठी लागलेल्या उर्दू भाषेतील पोस्टरबद्दल देखील मत व्यक्त केले आहे. “मालेगावमध्ये उर्दू पोस्टर लागणे हे काय लगेच हिंदुत्व सोडलं अस नाही. मुस्लिम समाजाला उद्धव ठाकरे यांनी काही आश्वस्त केलं असेल म्हणून मालेगाव मध्ये बोर्ड लागले असतील,” असे त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

दरम्यान, उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या या अचानक झालेल्या भेटीमुळे शिवसेनेत (शिंदे गट) मात्र अस्थिरता दिसून आली. तर दुसरीकडे स्थानिक पातळीवर भाजप आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये होणाऱ्या हाणामारीमुळे ही युती कधी पर्यंत टिकणार? यांवर आता प्रश्न उपस्थित करण्यात येऊ लागले आहेत.


- Advertisement -

हेही वाचा – ठाकरे बंधुंचे राजकारण : उद्धव ठाकरेंचे सर्वसमावेशकतेकडे तर राज कट्टरतेच्या दिशेने?

- Advertisment -