चंद्रपूर : चंद्रपूर हा वाघ आणि ‘वारां’चा जिल्हा आहे. सुधीर मुनगंटीवार आमचे नेते आहेत. विजय वडेट्टीवार आणि किशोर जोरगेवार हे आमचे मित्र आहेत. कुठलेही ‘वार’ असले तरी आम्ही त्यांचा सन्मानच करतो. कारण, आम्ही हेडगेवारांचे अनुयायी आहोत. त्यामुळे ‘वार’ हे आडनाव आल्याबरोबर आमचे हात जोडलेले असतात, अशी फटकेबाजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
दिवंगत कर्मवीर मारोतराव कन्नमवार यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती सोहळ्यानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी काँग्रेसचे नेते, विजय वडेट्टीवार, भाजपचे आमदार किशोर जोरगेवार उपस्थित होते. मात्र, सुधीर मुनगंटीवार यांनी अनुपस्थिती लावल्यानं चर्चांना उधाण आले होते.
हेही वाचा : वाल्मिक कराडचा पाय आणखी खोलात, ‘सीआयडी’ला ‘ती’ रेकॉर्डिंग सापडली; आता…
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “दादासाहेब कन्नमवार यांनी तुलनेने कमी लोकसंख्या, मागास आणि मेहनतीचे कार्य करणाऱ्या समाजात जन्म घेतला. त्यांना फार शिक्षण घेण्याची संधी मिळाली नाही. तरीदेखील त्यांनी आपलं व्यक्तीमत्त्व तयार केले. महात्मा गांधी आणि लोकमान्य टिळक यांच्या विचारांचा पगडा दादासाहेबांवर होता. त्यातून त्यांचं नेतृत्त्व उभे राहिले. मग, दादासाहेबांनी काँग्रेसचे काम सुरू केले.”
“दादासाहेबांना मुख्यमंत्री म्हणून फार कमी वेळ मिळाला. ते 1 वर्षे 4 दिवस मुख्यमंत्री होते. अजून काही काळ ते मुख्यमंत्री राहू शकले असते, तर त्यांच्या विकासाच्या संकल्पना निश्चितपणे मांडल्या असत्या,” असं फडणवीसांनी म्हटलं.
“आपण दादासाहेबांना कर्मवीर म्हणतो. ज्यांनी आपल्या जीवनात कर्म केले, कर्मातून समाज उभा केला, त्यांना आपण कर्मवीर म्हणतो. दादासाहेब हे ‘मूल’चे होते. माझे सगळे लहानपण हे ‘मूल’मध्ये गेले. कॉलेजमध्ये जाईपर्यंत वर्षातील चार महिने ‘मूल’मध्ये जायचे. ‘मूल’ किंवा चंद्रपूर जिल्ह्यातून दादासाहेब पहिले मुख्यमंत्री होते. मग, मी मुख्यमंत्री झालो. असे दोन मुख्यमंत्री हे आपण दिले आहेत. महत्त्वाचं म्हणजे दादासाहेब आधी उपमुख्यमंत्री होते, नंतर मुख्यमंत्री झाले. मी अर्थात मुख्यमंत्र्यांचा उपमुख्यमंत्री झालो आणि नंतर पुन्हा मुख्यमंत्री झालो,” अशी टिप्पणी देवेंद्र फडणवीस यांनी केली.
हेही वाचा : ‘ठाकरे गट झोपलेला,’ अमोल कोल्हेंच्या विधानावरून राऊतांनी सुनावलं; म्हणाले, “याचा अर्थ असा नाही की…”