काँग्रेस एक डुबते जहाज.., त्यांनी स्वत:चीच माणसं सांभाळावीत, बावनकुळेंची टीका

chandrashekhar bawankule

राज्यातील काही राजकीय पक्षांच्या नेत्यांकडून काँग्रेसच्या नेतृत्वाबाबत शंका उपस्थित केली जात आहे. विधान परिषद निवडणुकीत सत्यजित तांबे यांना काँग्रेस पाठिंबा देणार नाही, असे विधान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले. शिवाय सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरल्याने त्यांचा बंडखोर असाही उल्लेख नाना पटोले यांनी केला. त्यामुळे सत्यजित तांबे नेमके कुठल्या पक्षाचे?, असा सवाल उपस्थित केला जात आहे. दरम्यान, काँग्रेस एक डुबते जहाज असून त्यांनी स्वत:चीच माणसं सांभाळावीत, असं म्हणत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर टीका केली.

नागपुरात चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, देशातील आणि महाराष्ट्रातल्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना वाटते की, काँग्रेस डुबते जहाज आहे. त्यामुळे त्या जहाजावर कोणीही बसायला तयार नाही. अमित देशमुख यांनी मी ज्या घरात आहे त्याच घरात राहणार आहे असे सांगितले असले तरी तो काळ ठरवेल, असं बावनकुळे म्हणाले.

सत्यजीत तांबे यांनी अजूनही आमच्याकडून पाठिंबा मागितला नाहीये. आमच्याकडे आले तर हा विषय आमच्या राज्य आणि केंद्रीय संसदीय मंडळाकडे जाईल. त्यानंतर ते निर्णय घेतील. आमच्या तीन उमेदवारांनी अर्ज भरले. मात्र त्यांना एबी फॉर्म दिले नाही, असंही बावनकुळे म्हणाले.

नेमके प्रकरण काय?

विधान परिषद निवडणुकीत भाजपविरोधात एकजुटीने उमेदवार देण्याचे निश्चित झाले असताना महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचे गुरुवारी समोर आले. नाशिकमध्ये काँग्रेसच्या अधिकृत उमेदवाराने अर्ज न भरल्याने काँग्रेसचीच कोंडी झाली. येथील पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत काँग्रेसने डॉ. सुधीर तांबे यांना अधिकृत उमेदवारी जाहीर केली होती. डॉ. सुधीर तांबे यांच्या उमेदवारीची घोषणा गुरुवारी सकाळी दिल्लीतून करण्यात आली, मात्र उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत डॉ. तांबे यांनी अर्ज सादर केला नाही. त्यांच्याऐवजी त्यांचे पुत्र आणि युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. अपक्ष अर्ज सादर करून सत्यजित तांबे यांनी एकप्रकारे काँग्रेसला सोडचिठ्ठीच दिली आहे.


हेही वाचा : सत्यजित तांबेंना भाजपा पाठिंबा देणार का? फडणवीस म्हणाले, युवानेता म्हणून