Homeमहाराष्ट्रBjp Vs Thackeray : "आदित्य ठाकरे बालिश, बिघडलेले कार्टे, मंत्री असताना दोन...

Bjp Vs Thackeray : “आदित्य ठाकरे बालिश, बिघडलेले कार्टे, मंत्री असताना दोन वर्षे फक्त…”, भाजपच्या मंत्र्यानं सुनावलं

Subscribe

Aaditya Thackeray On Devendra Fadnavis : आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री फडणवीसांच्या दावोस दौऱ्यावर टीका केली होती. याला भाजपच्या मंत्र्यानं उत्तर दिलं आहे.

नागपूर : दावोसमधील 29 कंपन्यांशी करार झाले. त्यातील फक्त 1 कंपनी पदेशी आणि उर्वरित 28 कंपन्या भारतातील आहेत. तर, 20 कंपन्या महाराष्ट्रातील असून 15 कंपन्या मुंबईतल्या मुख्यमंत्री कार्यालयाजवळील आहेत, असं सांगत शिवसेना ( ठाकरे गट ) आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दावोस दौऱ्यावर टीका केली आहे. याला महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. बिघडलेल्या मानसिकतेत जे कार्टे आहेत, ते काही सुधारत नाहीत, असा शब्दांत बावनकुळेंनी आदित्य ठाकरेंना फटकारलं आहे. ते नागपुरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, “उद्धव आणि आदित्य ठाकरे बालिश आहेत. दोघांना पूर्ण सरकार कळलं नाही. आदित्य ठाकरे दोन वर्षे पर्यटनमंत्री होते. ते फक्त पर्यटन करत राहिले. त्यांना अजून सरकारमधील मूळ गाभा कळला नाही.”

“17.75 लाख कोटी रूपये महाराष्ट्रात गुंतवणूक आणली आहे. परंतु, बिघडलेल्या मानसिकतेत जे कार्टे आहेत, ते काही सुधारत नाहीत. विदर्भ बदलणार आहे. हा महाराष्ट्र थांबणार नाही. महाराष्ट्र पुढे जाणार आहे. विकसित महाराष्ट्र होणार आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखाली 2014 ते 2019, नंतर एकनाथ शिंदे यांचं सरकार आणि आताचे सरकार हे महाराष्ट्राच्या विकासासाठी आहे. विदर्भाला आतापर्यंत मागासलेपण होते. हे सर्व मागासलेपण दूर होणार आहे,” असं बावनकुळेंनी म्हटलं.

हेही वाचा : हे तर वेश्येचे राजकारण, संजय राऊत यांची सडकून टीका

उद्धव ठाकरे यांनी महापालिका निवडणुकीत स्वबळाचे संकेत दिले आहेत. याबद्दल प्रश्न विचारल्यावर बावनकुळे म्हणाले, “उद्धव ठाकरेंना काँग्रेस आणि शरद पवार यांनी सोडून दिले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंना दुसरा काही मार्ग नाही. उद्धव ठाकरे, ‘हम दो, हमारे दो’, एवढेच राहतील.”

आदित्य ठाकरे काय म्हणाले होते?

‘एक्स’ अकाउंटवर ट्विट करत आदित्य ठाकरेंनी म्हटलं, “आपल्या राज्यात आणि देशात होणाऱ्या कोणत्याही गुंतवणुकीचे स्वागत आहेच. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी ह्यांच्या दावोस दौऱ्याचे प्लॅनिंग त्यांच्या कार्यालयाकडून योग्य प्रकारे झाले नसल्याचे दिसते. दावोस येथे 29 कंपन्यांशी सामंजस्य करार (MoUs) झाले आहेत. त्यातील फक्त 1 कंपनी परदेशी आहे, उर्वरित 28 कंपन्यांचे मुख्यालय भारतात आहे. विशेष म्हणजे, ह्यातील 20 कंपन्या महाराष्ट्रात असून, त्यातील 15 कंपन्या मुंबईतल्या मुख्यमंत्री कार्यालया जवळच्याच आहेत.”

“हे लक्षात घेता प्रश्न निर्माण होतो की, ह्या कंपन्यांना सामंजस्य करार करण्यासाठी दावोसला का नेण्यात आले? दावोसमधील वेळ आंतरराष्ट्रीय नेते, कंपन्या आणि तेथील उद्योजकांशी संवाद साधण्यासाठी वापरता आला असता. दावोस हे जागतिक स्तरावर संबंध निर्माण करण्यासाठी योग्य ठिकाण आहे. जेथे अनेक प्रतिभावान व्यक्ती आणि विविध संस्था एकत्र येतात. अशा ठिकाणी महाराष्ट्राच्या हितासाठी जगाशी संवाद साधण्याऐवजी मुख्यमंत्री राज्यातील, देशातीलच कंपन्यांमध्ये गुंतून राहण्यात काय फायदा? इतर कंपन्यांशी संपर्क करा. जागतिक घडामोडींचा अंदाज घेण्यासाठी तेथील सर्वोत्तम सेशन्सना उपस्थित रहा. ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’ कार्यक्रम महाराष्ट्रातच का घेता आला नाही? तो 2022 च्या मध्यापासून झालेला नाही. हे सामंजस्य करार महाराष्ट्रातच पार पाडून जागतिक कंपन्यांना आपल्याकडे बोलावणे, उचित ठरले असते,” असा टोला आदित्य ठाकरेंनी लगावला आहे.

“मुख्यमंत्र्यांनी असे सामंजस्य करार आपल्या राज्यात आयोजित करून जगाशी दावोससारख्या व्यासपीठावर संपर्क साधावा, अशी नम्र विनंती. तसेच, WEF सोबत चर्चा करून महाराष्ट्रात ‘समर दावोस’ किंवा ‘मिड इयर दावोस’ आयोजित करणे, हेसुद्धा एक दूरदृष्टीचे पाऊल ठरेल. मे 2022 मध्येच आम्ही तसे प्रस्तावित केले होते. असो, गंमत अशी आहे की, अख्ख नगर विकास खाते मुख्यमंत्र्यांसोबत दावोसला, मंत्री रुसून गावी! आणि त्याच गॅंगमधले दुसरे मंत्री मुख्यमंत्र्यांनी दावोसला नेलेत,” अशी फटकेबाजी आदित्य ठाकरेंनी केली आहे.

हेही वाचा : पालिका निवडणुका ठाकरे स्वबळावर लढवणार? शरद पवारांनी दिली ही प्रतिक्रिया