मुंबई : राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलं आहे. 230 जागा घेत महायुतीच्या वादळाने महाविकास आघाडीला भुईसपाट केलं आहे. मात्र, सत्तेत येताच महायुतीत मुख्यमंत्रिपदावरून ओढाताण सुरू झाली आहे. एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावे, अशी शिवसेनेच्या नेत्यांकडून मागणी होताना दिसत आहे. तर दुसरीकडे भाजपा नेतेही म्हणत आहेत की, देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री व्हावे. याचपार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले की, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बनणार असतील, तर आमचे 20 आमदार त्यांना पुरुन उरतील. याप्रकरणी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना प्रश्न विचारला त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. (Chandrashekhar Bawankule criticizes Uddhav Thackeray for criticizing Devendra Fadnavis)
उद्धव ठाकरे यांनी यापूर्वीही देवेंद्र फडणवीस यांना आव्हान दिले आहे. नागपुरात येऊन देवेंद्र फडणवीस यांची जमानत जप्त करू, असे वक्तव्य त्यांनी सभेतून वक्तव्य केले होते. मात्र देवेंद्र फडणवीस 40 हजार मतांनी निवडून आहे. ठाकरेंनी मागच्या 5 वर्षांत जेव्हा जेव्हा फडणवीस यांच्यावर टीका केला, तेव्हा तेव्हा फडणवीस सुर्यासारखे वर आले. पण आता ठाकरेंनी आपल्या आमदारांना जे म्हटलं आहे. मी एवढंच सांगेन की, देवेंद्र फडणवीस यांना उद्धव ठाकरेंनी आव्हान देण्याचा प्रयत्न केला, तर त्यांच्याकडे फक्त 2 आमदार शिल्लक राहतील आणि बाकीचे 18 गायब होतील, असा दावा बावनकुळे यांनी केला.
हेही वाचा – Shivsena Vs Bjp : ‘बिहार पॅटर्न’नुसार मुख्यमंत्री करा, शिंदे गटाची मागणी; भाजपचे नेते म्हणाले…
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, उद्धव ठाकरेंकडे जे आमदार आहेत, ते फडणवीस यांच्यावर प्रेम करणारे आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी फडणवीस यांना आव्हान दिलं तर त्यांच्याकडचे 18 आमदार पळून जातील. कारण फडणवीस हे लोकनेते आहेत. सर्व आमदाराचं काम करणारे नेते आहेत. काम करताना त्यांनी कधीही पक्ष पाहिला नाही. जेव्हा आमचं सरकार होतं, तेव्हा फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना पूर्ण मदत केली आहे. ठाकरे सांगतील, त्या पद्धतीने त्यांनी सरकार चालवलं आहे. पण आता उद्धव ठाकरे काँग्रेससोबत बसून आपले हाल करत आहेत. त्यामुळे मी एवढंच म्हणेन की, यापुढे उद्धव ठाकरेंनी फडणवीस यांना आव्हान केलं तर त्यांच्याकडे फक्त 2 आमदार राहतील आणि 18 गायब होतील, असा पुनरुच्चार चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.
काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?
दरम्यान, विधानसभा निवडणुकीत विजयी झालेल्या नवनिर्वाचित 20 आमदारांची आज मातोश्री निवास्थानी शिवसेना ठाकरे गटाकडून बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत उद्धव ठाकरेंनी नवनिर्वाचित आमदारांना मार्गदर्शन केलं. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधत रणशिंग फुंकलं. “ते फडण’वीस असले तरी आपण ‘वीस’ आहोत. आपण त्यांना पुरून उरू,” असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी या बैठकीत व्यक्त केला.
हेही वाचा – Politics : ट्रम्पेटने काही मतं घेतली, मला लाभ झाला; पवारांसोबतच्या भेटीनंतर वळसे पाटील म्हणाले…