भाजपचा मुख्यमंत्री होणार, हे स्पष्ट झालं आहे. मात्र, तरीही मुख्यमंत्रिपदासाठी भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेत कुरबूर सुरू असल्याचं बोललं जात आहे. जर, भाजपचा मुख्यमंत्री झाला, तर दुसऱ्या क्रमांकासाठी शिंदेंच्या शिवसेनेत आणि अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीत रस्सीखेच सुरू असल्याची चर्चा आहे. मात्र, यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.
बावनकुळे म्हणाले, “शिंदेंच्या शिवसेनेत आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीत कुठलीही रस्सीखेच नाही. आम्ही तिघेही भावासारखे आहोत. तिघेही सख्खे भाऊ म्हणून काम करत आहे. सावत्र भाऊ भांडत आहेत. आम्ही चांगलं सरकार चालवू. सावत्र भाऊ ईव्हीएमवर बोट दाखवून आपला वेळकाढूपणा करत आहेत.”
हेही वाचा : राऊतांनी म्हटलं, ‘एकनाथ शिंदेंचं मानसिक संतुलन बिघडलंय’; सेनेच्या आमदाराने धू-धू धुतले; म्हणाले, “चार घरचा…”
भाजपचा गटनेता निवडण्यास का वेळ लागत आहे? असा प्रश्न विचारल्यावर बावनकुळेंनी म्हटलं, “दिल्लीपासून गल्लीपर्यंत आमच्या पक्षात कुठेही वाद नसतो. केंद्रीय नेतृत्त्व आमचं मजबूत आहे. त्यामुळे पक्षात वेगळं मत मांडण्याचा कुणालाही अधिकार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा जो निर्णय करतील, तो एका मिनिटात मान्य होतो. यामुळे आमच्या पक्षात काही गडबड आहे, असं काहीही नाही.”
भाजप हा विषारी नाग आहे. त्यांच्यासोबत जाणाऱ्यांना डंख मारतो, अशी टीका शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार संजय राऊत यांनी केली होती. यावर बावनकुळे म्हणाले, “संजय राऊत हे अस्वस्थ आहेत. त्यांना बहुमत मिळालं नाही. आमदारही निवडून आले नाहीत. कुणी विचारत नाही. अवस्थ मानसिकतेतून ते बोलत आहेत. स्वस्थ मानसिकतेत आल्यानंतर संजय राऊत यांचं ऐकू.”
हेही वाचा : एकनाथ शिंदेंनी अमित शाहांसमोर ठेवलेत ‘हे’ तीन पर्याय, अन्यथा…