नागपूर शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार सुधाकर अडबाले यांचा विजय झाला आहे. तर भाजपाने पाठिंबा दर्शवलेल्या नागो गाणार यांचा पराभव झाला आहे. यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून विविध प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. नागपूर हा भाजपचा बालेकिल्ला असून हा देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांचा पराभव असल्याचं ठाकरे गटाचे नेते आणि खासदार विनायक राऊत यांनी म्हटलं आहे. दरम्यान, याला भाजपाचं अपयश नाही म्हणता येणार, असं मोठं वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आहे.
चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, ती जागा गेली. याला काही भाजपाचं अपयश म्हणता येणार नाही. भाजपाचा एबी फॉर्म नाही, उमेदवार नाही. जर भाजपा उमेदवार असता तर अजून काही वेगळं चित्र असतं, असं बावनकुळे म्हणाले.
कोकणमध्ये आम्ही जिंकलो आहोत. सत्यजित तांबेही आघाडीवर आहेत. त्यांनाही आम्ही समर्थन दिलं होतं. मराठवाड्यातील जागेवर विक्रम काळे यांच्या मतांचा फरक बघा, मागीलवेळी ते कुठे होते आणि आता ते कुठे आले आहेत. १४ हजारांच्यावर मतं आम्ही घेतली आहेत. नाशिकची जागाही महाविकास आघाडीकडे होती. नागपुरची जागा मात्र शिक्षक परिषदेची होती, ती भाजपाची नव्हती, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
भाजपच्या मातृसंस्थेच्या बालेकिल्ल्यातच महाविकास आघाडीचा भाजपला दणका.
नागपूर शिक्षक मतदारसंघातून महाविकास आघाडीचे सुधाकर अडबोले विजयी.
— Nana Patole (@NANA_PATOLE) February 2, 2023