मुंबई : भारताच्या चांद्रयान-3 (Chandrayaan-3) मोहिमेचे लँडर मॉड्यूल (LM) चंद्राच्या कक्षेत फिरत आहे आणि इतिहास रचण्यासाठी सज्ज आहे. बुधवारी (23 ऑगस्ट) संध्याकाळी 6.04 वाजता लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल, असे इस्रोने म्हटले आहे. त्यामुळे उद्याचा दिवस भारतीयांसाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. पण यावरून देखील आता श्रेय वादाची लढाई सुरू असल्याचे बोलले जात आहे. कारण मोदी सरकारच्या काळात ही मोहीम फत्ते झाल्यानंतर मोदी सरकारला या मोहिमेचे श्रेय जाणार असल्याची चर्चा करण्यात येत आहे. पण या श्रेय वादाच्या लढाईवरून आता ठाकरे गटाचे प्रमुख प्रवक्ते संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. चांद्रयान-3 चे श्रेय कोणी घेऊ नये, याचे संपूर्ण श्रेय हे संशोधकांचे आहे, असे मत संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे. (Chandrayaan-3 No one should take Credit, Sanjay Raut challenge to central government)
हेही वाचा – “दीडशहाणे मंत्री कालपर्यंत…” कांद्याच्या प्रश्नावरून संजय राऊतांनी दादा भुसेंना केले लक्ष
प्रसार माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, चांद्रयान-3 चे श्रेय हे देशातील वैज्ञानिकांना दिले पाहिजे. हे कोणी राजकीय श्रेय घेण्याचे कारण नाही. वर्षानुवर्षे ते या मोहीमेवर आपल्या देशाचे वैज्ञानिक, संशोधक आणि शास्त्रज्ञ काम करत असतात. हे आता नाही 25-30 वर्षांपासून काम करत आहे. त्यामुळे याचे संपूर्ण श्रेय आपल्या देशातील वैज्ञानिकांना आणि शास्त्रज्ञांना द्यावे लागेल. कोणत्याही राजकीय नेत्याने, राजकीय पक्षाने, पंतप्रधानांनी आणि संबंधित खात्याची मंत्र्यांनी याचे श्रेय घेऊ नये, असा इशाराच संजय राऊतांकडून देण्यात आला आहे.
ज्याप्रमाणे सर्जिकल स्ट्राईकचे श्रेय हे एका राजकीय पक्षाने निवडणुकीमध्ये घेतले. मग तो सर्जिकल स्ट्राईक तुम्ही चीनवर का करत नाही, असा प्रश्न संजय राऊत यांच्याकडून उपस्थित करण्यात आला. राहुल गांधी यांनी सांगितले की चीनने लडाख आणि पँगाँग लेकपर्यंत घुसखोरी केली आहे हे 100 टक्के खरं आहे. मग तरी हे सरकार गप्प का आहे? असा खोचक प्रश्न राऊतांकडून विचारण्यात आला आहे. सर्जिकल स्ट्राईक पाकिस्तानवर केल्याचा दावा करण्यात येत आहे. मग त्याच प्रकारे चीनवर सर्जिकल स्ट्राईक का करत नाही. चीनसमोर हे सरकार का शांत आहे? असेही संजय राऊत म्हणाले.