प्रेमानंद बच्छाव
मुंबई : विधानसभा निवडणुकीतील नामुष्कीजनक पराभवानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात नेते जयंत पाटील यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटविण्याच्या मागणीने जोर पकडला आहे. गुरुवारी झालेल्या पक्षाच्या बैठकीत कार्यकर्त्यांनी पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या समोरच उघडपणे जयंत पाटील यांना बदलण्याची मागणी करत युवा नेते रोहित पवार आणि रोहित पाटील यांना संधी देण्याची मागणी करण्यात आली. यावर जयंत पाटील यांनी देखील पलटवार करत, संघटनेतील प्रत्येकाने आपल्या प्रभागात पक्षाला किती मते मिळाली याची माहिती द्यावी, असे आव्हान देत येत्या आठ दिवसात आपण स्वतःहून प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देणार असल्याचे जाहीर केले. (change state president of party demand to sharad pawar in front of jayant patil)
पाच वर्षाहून अधिक काळ प्रदेशाध्यक्षपदी असलेल्या आणि विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतरही पदाला चिकटून बसलेल्या जयंत पाटील यांच्या विरोधातील असंतोष आता बाहेर येऊ लागला आहे. पाटील यांच्या विरोधात कर्जत – जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी आघाडी उघडल्याचे बोलले जात आहे. यापूर्वीही रोहित पवार यांनी जाहीर कार्यक्रमात याबाबत भाष्य केले होते. त्यातूनच आजच्या बैठकीत प्रदेशाध्यक्ष बदलण्याची मागणी पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून पुढे करण्यात आली.
हेही वाचा – Sachin Pilot : जीएसटीच्या कररचनेत बदल करा; काँग्रेस नेत्याची मागणी
आजच्या बैठकीत प्रदेशाध्यक्ष बदलण्याची मागणी करताना नवीन प्रदेशाध्यक्ष हा पक्ष संघटनेला आणि कार्यकर्त्यांना वेळ देणारा तसेच मराठा समाजाव्यतिरिक्त असावा, अशी महत्त्वाची मागणी करण्यात आली. संघटनेतील सर्वच प्रमुख पदाधिकारी बदलण्याची मागणीही बैठकीत करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
या मागणीवर जयंत पाटील यांनी पक्षाला नवीन पदाधिकारी आणि प्रदेशाध्यक्ष देण्याची मागणी करण्यात आली आहे, हे वास्तव असल्याचे मान्य केले. मी एकटा कितीवेळ काम करणार? आठ दिवसांचा वेळ द्या स्वत:हून प्रदेशाध्यक्षपद सोडतो, असे आपण बैठकीत सांगितल्याचे पाटील यांनी पत्रकारांना सांगितले. तत्पूर्वी निवडणुकीत बुथवर काम केल्याचा डेटा देण्याची सूचना आपण केली आहे. कुणी काय काम केले याची सविस्तर माहिती द्यावी, त्यानंतर प्रदेशाध्यपदावरुन बाजूला होतो. “बोलणं सोपं असतं, चांगला माणूस मिळणं अवघड असतं,” असा टोलाही जयंत पाटील यांनी यावेळी लगावला.
पक्ष चालवणं हे अजिबात सोपे काम नाही. जोरदार भाषण करून काही उपयोग नसतो. डोकं शांत ठेवून आक्रमक कार्यकर्त्यांसह शांत कार्यकर्त्यांना एक करायचं असतं, अशा शब्दात जयंत पाटील यांनी रोहित पवार यांना अप्रत्यक्षरित्या सुनावले.
हेही वाचा – Torres Scam : टोरेस घोटाळ्याप्रकरणी पोलिसांचे सहा ठिकाणी सर्च ऑपरेशन; अडीच ते तीन कोटींची रोकड जप्त
Edited by : Ashwini A. Bhatavdekar