घरमहाराष्ट्रराज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षा पद्धतीत बदल

राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षा पद्धतीत बदल

Subscribe

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या दर्जाची परीक्षा होणार

राज्य लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) परीक्षा पद्धतीमध्ये आमूलाग्र बदल करीत परीक्षेचा दर्जा केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेशी समकक्ष केला आहे. यानुसार आता मुख्य परीक्षा १७५० गुणांची होणार आहे. (Changes in the examination system of the MPSC)

राज्यसेवा पूर्व परीक्षेतील पेपर क्रमांक दोनबाबत अनेक उमदेवारांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानुसार यावर अभ्यास करण्यासाठी सेवानिवृत्त सनदी अधिकारी चंद्रकांत दळवी, धनंजय कमलाकर आणि माजी कुलगुरू एस. एफ. पाटील यांची समिती नेमण्यात आली होती. या समितीच्या शिफारशींनुसार राज्य लोकसेवा आयोगाने परीक्षेच्या स्वरूपात बदल करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. याबाबतचे प्रसिद्धीपत्रक राज्य लोकसेवा आयोगाकडून शुक्रवारी प्रसिद्ध करण्यात आले. त्यानुसार पूर्व परीक्षेतील पेपर क्रमांक २ (सीसॅट) अर्हताकारी करण्यासाठी २ मे रोजी प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकानुसार किमान ३३ टक्के गुणांची अट निश्चित करण्यात आली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – मुंबईतील मतदारांमध्ये ७ लाखांनी वाढ; मतदार यादी प्रसिद्धी

हा निर्णय २१ ऑगस्ट रोजी होणार्‍या पूर्व परीक्षेपासून लागू करण्यात येणार आहे. याचबरोबर सर्वांत महत्त्वाचा बदल मुख्य परीक्षेत करण्यात आला आहे. हा बदल करताना ही परीक्षा केंद्रीय लोकसेवा आयोगाशी समकक्ष करण्यात आली आहे. सध्या मुख्य परीक्षा ७०० गुणांची होते आणि १०० गुणांची मुलाखत घेण्यात येते, मात्र आता ही मुख्य परीक्षा १७५० गुणांची होणार आहे, तर २७५ गुणांची मुलाखत घेण्यात येणार आहे. अशा प्रकारे एकूण २०२५ पैकी गुण देण्यात येणार आहेत. यामध्ये एकूण नऊ पेपर होणार आहेत. ही संपूर्ण परीक्षा वर्णनात्मक स्वरूपाची असणार आहे. यामध्ये भाषा पेपर १ मराठी आणि भाषा पेपर २ इंग्रजीचा प्रत्येकी ३०० गुणांचा होणार असून यामध्ये प्रत्येकी २५ टक्के गुणांची अर्हता निश्चित करण्यात आली आहे. याशिवाय अन्य सात पेपर असतील.

- Advertisement -

यामध्ये दोन्ही माध्यमांच्या निबंधासाठी २५० गुणांचा पेपर, सामान्य अध्ययनाचे चार पेपर आणि दोन वैकल्पिक विषयांच्या पेपरचा समावेश असणार आहे. सामान्य अध्ययन १, सामान्य अध्ययन २ व सामान्य अध्ययन ३ या पेपरमध्ये आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय व महाराष्ट्राशी संबंधित विषयांच्या अभ्यासक्रमाचा समावेश राहील, तर सामान्य अध्ययन ४ हा पेपर उमेदवारांसाठी नैतिकता, चारित्र्य व योग्यता या विषयावर राहील, असेही आयोगाने स्पष्ट केले आहे. वैकल्पिक विषयांसाठी २६ विषयांचे पर्याय विद्यार्थ्यांना देण्यात आले आहेत. राज्यसेवा मुख्य परीक्षेकरिता हे बदल मुख्य परीक्षा २०२३पासून लागू करण्यात येतील, असे आयोगाच्या सचिवांनी स्पष्ट केले आहे.

अशी आहे नवी परीक्षा योजना
परीक्षेचे स्वरूप : वर्णनात्मक
एकूण पेपर – ९

अर्हताकारी पेपर
१. भाषा पेपर १ – मराठी – ३०० गुण
२. भाषा पेपर २ – इंग्रजी – ३०० गुण

गुणवत्ता यादीकरिता विचारात घ्यावयाचे पेपर
१. निबंध (मराठी किंवा इंग्रजी माध्यम) – २५० गुण
२. सामान्य अध्ययन – १ – २५० गुण
३. सामान्य अध्ययन – २ – २५० गुण
४. सामान्य अध्ययन – ३ – २५० गुण
५. सामान्य अध्ययन – ४ – २५० गुण
६. वैकल्पिक विषय पेपर क्रमांक १ – २५० गुण
७. वैकल्पिक विषय पेपर क्रमांक २ – २५० गुण

एकूण गुण – १७५०
मुलाखत – २७५ गुण
एकूण गुण – २०२५

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -