सर्वसामान्यांच्या ताटातून चपातीही कमी होणार

मोदी सरकारचा निर्णय: रेशनवरील गहू झाला कमी

मनीष कटारिया । नाशिक

सर्वसामान्यांना आधार असलेल्या रेशनवरील गहू कमी झाला आहे. गव्हाचे दर वाढल्याने तसेच रशिया- युक्रेन युद्धाचा परिणाम दिसून येत आहे. त्यामुळे आता रास्तधान्य दुकानात आता गहू कमी मिळणार आहे परिणामी सर्वसामान्यांच्या ताटातून चपातीही कमी होणार आहे.

कोरोनाचा सामना करण्यासाठी शासनामार्फत पंतप्रधान गरीब कल्याण योजना अंतर्गत गरिबांना मार्च-एप्रिल २०२० पासून मोफत धान्य देण्यात आले. त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गरिबांना मे व जून २०२१ मध्ये मोफत धान्य वाटपाची योजना जाहीर केली होती. त्याच दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील गरिबांसाठीच्या पंतप्रधान गरीब कल्याण योजनेची व्याप्ती जुलै ते नोव्हेंबर २०२१ पर्यंत वाढवली होती. दरम्यान ही मुदत नोव्हेंबर २०२१ मध्ये संपत असतानाच केंद्र सरकारने मार्च २०२२ पर्यंत मोफत धान्य देण्याचे जाहीर केले होते. ही मुदत संपत असतानाच केंद्र सरकारने योजनेला आणखी सप्टेंबर २०२२ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. महागाईच्या काळात बाजारातून गहू खरेदी करणे न परवडणार्‍या व्यक्तींसाठी रेशनचा पर्याय लाभदायक ठरतो. परंतु आता पुरवठा विभागाने रेशनवरील गहू कमी करुन त्याऐवजी तांदूळ देण्याचा निर्णय घेतला आहे.

गव्हाचे उत्पादन कमी झाल्याने हा निर्णय घेतल्याची चर्चा सुरु आहे. अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने सर्व जिल्हाधिकार्‍यांना तसे आदेश दिले आहेत. लाभार्थ्यांना सवलतीच्या दरात धान्य मिळत असल्याने त्याचा लाभ हजारो लाभार्थ्यांना होतो. अनेक लाभार्थी कुटुंबाचा संपूर्ण उदरनिर्वाह याच धान्यातून होतो. त्यामुळे लाभार्थ्यांच्या जीवनात सवलतीच्या दरातील धान्य वाटपाला अतिशय महत्त्व आहे. परंतू आता सरकारने गव्हाचा कोटाच कमी करण्याचा निर्णय घेतल्याने सर्वसामान्यांना वरण भातावरच दिवस काढावे लागणार आहे.

कोटा कमी करण्याचे हे आहे कारण

खरिपातील कापूस आणि सोयाबीनच्या बाबतीत जे घडले तेच आता रब्बीतील गव्हाच्या बाबतीत होताना पाहवयास मिळत आहे. रब्बीतील या दोन्ही मुख्य पिकांच्या पेर्‍यात घट झाली होती. त्याचे परिणाम आता बाजारपेठेत पाहवयास मिळत आहेत. उत्पादन घटल्याने गतवर्षीच्या तुलनेत गव्हाचे दर 600 रुपयांनी वाढले आहेत. ही दरवाढ होत असतानाच केंद्र सरकारने निर्यात बंदीचा निर्णय घेतला आहे. दरवाढीची ही प्रक्रिया सुरु असतानाच आता अधिकचा दर मिळावा म्हणून शेतकर्‍यांनी गव्हाच्या विक्रीपेक्षा साठवणूकीवर भर देण्यास सुरवात केली आहे. देशांतर्गत गव्हाची टंचाई भासू नये म्हणून केंद्र सरकारने निर्यात बंदीचा निर्णय घेतला आहे. उत्पादनात घट झाल्याने दरवाढ निश्चित मानली जात आहे. त्यामुळे आता सरकारने मोफतच्या धान्य वितरणातही कपात केल्याचे समजते.

नव्या आदेशानूसार आता असे होणार वितरण

प्राधान्यक्रम कुटुंबातील लाभार्थ्यांना प्रती व्यक्ती ३ किलो गहू, २ किलो तांदुळ वितरीत केला जात होता आता नव्या आदेशानुसार २ किलो गहू आणि ३ किलो तांदुळ दिला जाईल. अंत्योदय लाभार्थ्यांना प्रती कार्ड २० किलो गहू आणि १५ किलो तांदुळ असे ३५ किलो धान्य दिले जात होते आता १५ किलो गहू आणि २० किलो धान्य दिले जाईल. पंतप्रधान गरीब कल्याण योजनेंतर्गत पूर्वी प्रती व्यक्ती ३ किलो गहू, २ किलो तांदुळ दिला जातो आता १ किलो गहू आणि ४ किलो तांदूळ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.