घरमहाराष्ट्रलॉकडाऊनमध्ये वाहनचालकांकडून पैसे उकळणाऱ्या पोलिसासह दोघांवर गुन्हे दाखल

लॉकडाऊनमध्ये वाहनचालकांकडून पैसे उकळणाऱ्या पोलिसासह दोघांवर गुन्हे दाखल

Subscribe

होम क्वारंटाईन असतानाही बाहेर पडून करीत होता वसूली

होम क्वारंटाईन करण्यात आलेल्या मुंबई पोलीस दलातील एका पोलीस कर्मचारी मित्राच्या मदतीने महामार्गावर वाहनचालकांची लूट करीत असल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलीस कर्मचाऱ्यासह दोन जणांविरोधात कळवा पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल कऱण्यात आला असल्याची माहिती कळवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय दरेकर यांनी दिली. याप्रकरणी पोलीस कर्मचाऱ्याच्या मित्राला अटक केली असून त्याच्याजवळून मुंबई पोलीस दलाचे बनावट ओळखपत्र आणि पोलीस गणवेश हस्तगत करण्यात आला आहे.

अमोल देवळेकर (४०) असे अटक करण्यात आलेल्या पोलीसाच्या मित्राचे नाव आहे. अमोल हा भिवंडी येथे राहणारा आहे. अमोलचा मित्र प्रसाद महाडिक हा मुंबई पोलीस दलाच्या वाहतूक विभागात कार्यरत आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रसाद महाडिक याला होम क्वारंटाईन करण्यात आलेलं आहे. होम क्वारंटाईनच्या कालावधीत प्रसाद आणि अमोल या दोघांनी मुंबई, ठाणे परिसरात लॉकडाऊनमध्ये वाहने घेऊन फिरणाऱ्या वाहनचालकांना अडवून त्यांच्याकडून रक्कम उकळण्याचा बेत आखला होता. अमोलने स्वतःचे मुंबई पोलीस दलाचे बनावट ओळखपत्र तयार करून घेतले होते, तसेच पोलीस गणवेश देखील मिळवला होता. हे दोघे लॉकडाऊनमध्ये मुंबई, ठाणे येथील महामार्गावर उभे राहून वाहनांना थांबवून त्यांचे कागदपत्रे तपासत, त्यानंतर कागदपत्रात काहीतरी चुका काढून अथवा लॉकडाऊनमध्ये विनाकारण बाहेर पडल्याप्रकरणी कारवाई करण्याची भीती दाखवून वाहन चालकांकडून मोठी रक्कम उकळत होते.

- Advertisement -

या दोघांचा हा गोरखधंदा मागील काही आठवड्यापासून सुरु होता, याची माहिती कळवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय दरेकर यांना मिळाली असता त्यांनी पोलीस पथकासह कळवा परिसरात सापळा लावून अमोल देवळेकर याला रविवारी ताब्यात घेऊन त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली असल्याची माहिती दरेकर यांनी दिली. कळवा पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या अमोल देवळेकर याच्याकडून मुंबई पोलीस दलाचे बनावट ओळखपत्र तसेच पोलीस गणवेश आणि फायबरची काठी ताब्यात घेतली आहे. प्रसाद महाडिक हा मुंबई पोलीस दलाच्या वाहतूक विभागात कार्यरत असून सध्या त्याला काही दिवसांपासून होम क्वारंटाईन करण्यात आलेले असताना देखील तो बाहेर पडून हे कृत्य करीत होता अशी माहिती दरेकर यांनी दिली. होम क्वारंटाईन असल्याकारणाने त्याला अद्याप अटक करण्यात आलेली नसून त्याचा होम क्वारंटाईनचा कालावधी संपल्यावर अटक करण्यात येईल असेही दरेकर म्हणाले.


हेही वाचा – महाविकास आघाडीत धुमशान

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -