नाशकातून दुचाकी चोरनारे चौघे पाटील निघाले उच्चशिक्षित

नाशिक : शहरात एकीकडे दुचाकी चोरीच्या घटना पोलिसांपुढे डोकेदुखी बनल्या असताना आता अतिशय चांगल्या घराण्यातील आणि उच्चशिक्षित तरुणांकडून ते उच्चपदावर नियुक्त असलेल्या कंपनीतील कंत्राटी कामगारांच्याच दुचाकी चोरण्याचे काम सुरू असेल, तर काय बोलावे? हे उच्चशिक्षित तरुण कंपनीतील कामगारांची वाहने पार्किंगमधून चोरून आपल्या मूळ गावी अंमळनेरला अवघ्या 10 हजारांत विकत असल्याची धक्कादायक बाब गुन्हे शाखा युनिट-1 च्या कारवाईतून पुढे आली आहे.

पोलीस प्रशासनाकडून सोमवारी (दि. १८) सायंकाळी आयुक्तालयात झालेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आलेल्या माहितीनुसार, नाशिक शहरातील अनेक दुचाकी चोरीच्या घटनांची उकल गुन्हे शाखा युनिट १ च्या कारवाईत झाल्याचे सांगण्यात आले. या कारवाईत अमोल दशरथ पाटील, विशाल अधिकार पाटील, दिनेश सुनील पाटील, मल्हारी रावसाहेब पाटील हे चौघेही राहणार अंमळनेर येथील उच्चशिक्षित तरुण 14 दुचाकी चोरीच्या घटनेत ताब्यात घेण्यात आले आहेत. आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेचे प्रवीण वाघमारे, प्रशांत मरकड हे दुचाकी चोरीच्या वाढत्या घटनांत तपास करताना सीसीटीव्ही फुटेजमध्ये सातपूर एमआयडीसी येथील एका नामंकीत कंपनीत हे संशयित म्हणजे उच्चशिक्षित कंत्राटी कामगार असल्याची बाब समोर आली. त्यानुसार पोलिसांनी अमोल पाटील, विशाल पाटील यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. सुरुवातीला त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. पथकाने दोघांना सीसी टिव्ही फुटेज दाखवल्यानंतर त्यांनी दुचाकी चोरी केल्याची कबूली दिली. वरिष्ठ निरिक्षक विजय ढमाळ, विष्णू उगले, रविंद्र बागुल, प्रदीप म्हसदे, असिफ तांबोळी, विशाल देवरे, महेश साळुंके, सुरेश माळोदे, शरद सोनवणे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

यांनी केली कामगिरी

ही कामगिरी आयुक्त जयंत नाईकनवरे, पोलीस उपायुक्त (गुन्हे शाखा) संजय बारकुंड, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) वसंत मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ, पोलीस उपनिरीक्षक विष्णू उगले, पोलीस अंमलदार रवींद्र बागूल, येवाजी महाले, प्रदीप म्हसदे, आसिफ तांबोळी, शरद सोनवणे, प्रवीण वाघमारे, मोतीराम चव्हाण, प्रशांत मरकड, विशाल देवरे, अण्णासाहेब गुंजाळ यांनी केली.

अल्पवयीन चोरटे सुसाट

पकडण्यात आलेल्या दुचाकी चोरट्यांचे वय पाहिल्यास ते २२ ते २३ वयोगटातील असल्याचे दिसून येते. मुख्य म्हणजे, अलिशान राहणीमान ठेवण्यासाठी, आपल्या गरजा भागवण्यासाठी त्यांनी दुचाकीचोरीचा धडाका लावल्याचे समोर आले आहे. तरुण वयातील नको त्या गरजा भागवण्यासाठी या चौघांनी सातपूरसह सरकारवाड, बडवाह (मध्येप्रदेश), अंमळनेर आणि राज्यात अन्य काही ठिकाणी दुचाकी चोरी केल्याचे दिसून आले आहे.

पोलीस अ‍ॅन्टी मोटरसायकल थेफ्ट रोखणार दुचाकी चोर्‍या

शहरात दुचाकी चोरीचे प्रमाण प्रचंड वाढले असताना आता पोलीस आयुक्तालयाकडून अ‍ॅन्टी मोटारसायकल थेफ्ट म्हणून विशेष पथके नियुक्त करण्यात आली आहेत. दुचाकी चोरीच्या घटना शहरात प्रचंड वाढल्या आहेत. नजर चुकत नाही, तोच वर्दळीच्या ठिकाणांहूनही दुचाकी चोरी होण्याच्या घटना घडत आहेत. शहरवासीयांकडून या घटनांवर आळा बसण्यासाठी पोलीस प्रशासनाने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी जोर धरू लागली आहे. तेव्हा दुचाकीचोरीचे प्रमाण आणि नागरिकांची मागणी लक्षात घेता पोलीस आयुक्तालयाकडून परिमंडळ एक पोलीस उपायुक्त आणि परिमंडळ दोन पोलीस उपायुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली अ‍ॅन्टी मोटारसायकल थेफ्ट नावाची दोन विशेष पथके नियुक्त करण्यात आली आहेत. परिमंडळ एक आणि दोन अंतर्गत येणार्‍या प्रत्येक पोलीस ठाण्यातून एक किंवा दोन पोलीस कर्मचारी, अधिकारी अशा प्रत्येकी ११ जणांचा एका पथकात समावेश असेल. दोन्ही पथकांच्या परिमंडळअंतर्गत येणार्‍या विविध भागांत दुचाकी चोरीसंदर्भातील गुन्हे लक्षात घेऊन प्रतिबंधक कारवाई होईल. यामुळे दुचाकी चोरांवर नियंत्रण मिळविणे शक्य होणार असल्याचे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले. दोन्ही पथके ३१ ऑगस्टपर्यंत कार्यान्वित असतील, मात्र त्यांना मिळणारा प्रतिसाद आणि उघडकीस येणारे गुन्हे लक्षात घेता पुढेही पथकाचा कार्यकाळ वाढवण्यात येईल.