पंढरपूरच्या श्री विठ्ठल मूर्तीस आज, उद्या रासायनिक लेप

वारकर्‍यांचा विरोध डावलून मंदिर समितीचा हेका

Pandharpur vitthal mandir pujari are being bossy

महाराष्ट्रातील कोट्यवधी वारकर्‍यांचे आराध्य दैवत श्री विठ्ठलाच्या पंढरपूर येथील स्वयंभू मूर्तीस २३ व २४ जूनला रासायनिक लेप करण्याचा निर्णय श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने घेतला आहे. रासायनिक लेप केल्याने स्वयंभू मूर्तीची हानी होणार असल्याने वारकर्‍यांचा या लेपास विरोध असतानाही मंदिर समितीने हेका कायम ठेवून त्याच्या तारखा जाहीर केल्याने वारकर्‍यांमध्ये संतापाची भावना आहे.

चंद्रभागेच्या काठावर कमरेवर हात ठेवून श्री विठ्ठल वारकर्‍यांना भवसागर तरून जाण्याचा दिलासा देत २८ युगांपासून उभा आहे. यामुळे दरवर्षी लाखो वारकरी आषाढी-कार्तिकीच्या वारीला शेकडो किलोमीटर पायी चालत येत असतो. या मंदिरात प्रत्येक वारकर्‍याला श्री विठ्ठलाच्या पायावर डोके टेकवून दर्शन घेता येते. यामुळे या मूर्तीच्या पायांची झीज झाली आहे. तसेच या मूर्तीचीही झीज झाली आहेे. यामुळे या आधी श्री विठ्ठल मूर्तीला दोन वेळा रासायनिक लेप करण्यात आला आहे. मात्र, या लेपानंतर मूर्तीची झीज होण्याचा वेग वाढत असून या मूर्तीचे स्वरूप दिवसेंदिवस बदलत चालल्याचे वारकर्‍यांचे म्हणणे आहे. यामुळे श्री विठ्ठल मूर्तीला रासायनिक लेप करण्यापेक्षा प्राचीन मूर्ती शास्त्रानुसार आयुर्वेदिक पद्धतीने वज्रलेप करण्यात यावा, अशी वारकर्‍यांची मागणी आहे. मात्र, मंदिर समितीने वारकर्‍यांच्या कुठल्याही मागण्यांचा विचार न करता आपले म्हणणे रेटण्याचा निर्णय घेतल्याचे दिसत आहे. त्यानुसार मंदिर समितीचे कार्यकारी अधिकार विठ्ठल जोशी यांनी सोमवारी (दि.२२) पत्रक जाहीर करून श्री विठ्ठल मूर्तीस करण्यात येणार्‍या रासायनिक लेपाचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार औरंगाबाद येथील भारतीय पुरातत्व शास्त्र विभागाचे अधीक्षक श्रीकांत मिश्रा यांच्या मार्गदर्शनाखाली २३ व २४ जून रोजी श्री विठ्ठल मूर्तीस रासायनिक लेप करण्यात येणार आहे. यावेळी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सर्व विश्वस्त उपस्थित राहणार असल्याचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी कळवले आहे.

वारकर्‍यांच्या भावना लक्षात घेऊन मुख्यमंत्री व मंदिर समिती यांच्याशी पत्रव्यवहारी करून रासायनिक पद्धतीने लेप करू नये, अशी मागणी केली होती. मात्र, मंदिर समितीच्या पदाधिकार्‍यांना मूर्तीचे नुकसान करण्याची एवढी घाई का झाली आहे, हे समजत नाही. कोल्हापूरच्या देवीच्या मूर्तीचे रासायनिक लेपामुळे नुकसान झाले आहे, यावरून मंदिर समिती काही धडा शिकणार आहे की नाही, हा खरा प्रश्न आहे.
– ललिता शिंदे, विश्वस्त, संत निवृत्तीनाथ समाधी मंदिर देवस्थान, त्र्यंबकेश्वर.