शिर्डीचं विमान उतरलं मुंबईत, वाचा काय झालं नेमकं…

शिर्डी विमानतळावर घिरट्या, विमानात होते १२६ साईभक्त

Spice Jet

सचिन बनसोडे, शिर्डी

चेन्नईहून शिर्डीसाठी आलेले स्पाईस जेटचे विमान (SG 547) बुधवारी (दि. १३) थेट मुंबई विमानतळावर उतरले. या निर्णयामुळे चेन्नईहून श्री साईबाबांच्या दर्शनासाठी निघालेल्या १२६ प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. कमी दृष्यमानतेमुळे हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती  शिर्डी विमानतळाचे व्यवस्थापक सुशीलकुमार श्रीवास्तव यांनी दिली.

शिर्डी विमानतळ १० ऑक्टोबर रोजी सुरू झाल्यानंतर बुधवारी ( दि. १३) चेन्नईहून आलेले विमान कमी दृष्यमानतेमुळे मुंबई विमानतळावर उतरवण्यात आले. या विमानात १२६ प्रवासी होते. विमान लँडिंग करण्यासाठी ५ हजार मीटरपर्यंत दृष्यमानता गरजेची असते. मात्र, ढगाळ वातावरणामुळे शिर्डी विमानतळावर ४ हजार मीटपर्यंतच दृश्यमानता होतील. त्यामुळे बराच वेळ घिरट्या घातल्यानंतर वैमानिकाने अखेर मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याचा निर्णय घेतला.

पास बुकिंग केलेल्या साईभक्तांना मनस्ताप

कोविड संकटामुळे ऑनलाईन पाससाठी बुकिंग केल्यानंतरच साई मंदिरात प्रवेश मिळतो. विमान मुंबईला लँड करावे लागल्याने या विमानाने आलेल्या साईभक्तांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला. बुधवारची वेळ निर्धारीत झालेल्या अनेक साईभक्तांना मात्र दर्शनापासून वंचित राहावे लागले. तर काहींवर पुन्हा पास काढण्याची नामुष्की ओढवली. शिर्डीहून चेन्नईसाठी तिकिट बुक केलेल्या प्रवाशांनादेखील मोठा मनस्ताप सहन करत विमानतळावरुनच माघारी परतावे लागले.

यापूर्वीदेखील अनेकदा शिर्डी विमानतळावर कमी दृष्यमानतेमुळे विमानसेवेत बाधा आल्याच्या घटना घडल्या आहेत. याठिकाणी नाईट लँडिंगसाठी यंत्रणा उभी करण्याचे काम धीम्या गतीने सुरू आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतरच हा प्रश्न कायमचा संपुष्टात येईल. मात्र, अद्याप तरी शिर्डी विमानतळावर दृष्यमानतेचे ग्रहण कायम आहे.