मुंबई : बहुप्रतिक्षित अशा छावा चित्रपटाची सर्वत्र चर्चा रंगली आहे. या चित्रपटात अभिनेता विकी कौशल याने छत्रपती संभाजीराजे यांची भूमिका केली आहे. हा चित्रपट प्रदर्शित होण्याची ज्याप्रमाणे सर्वांना उत्सुकता होती, त्याचप्रमाणे याच्या ट्रेलरची सुद्धा सर्वांना उत्सुकता होती. मात्र, ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर आता एका नव्या वादाला तोंड फुटले आहे. कारण यामध्ये शंभूराजे आणि येसुबाई यांना लेझीम खेळताना दाखवण्यात आले आहे. ज्याबाबत अनेक हिंदुत्ववादी संघटनांनी आणि स्वतः संभाजीराजे छत्रपती यांनी आक्षेप घेतला आहे. ज्यामुळे याबाबत आता सरकारमधील मंत्री उदय सामंत यांनी भूमिका स्पष्ट करत असे काहीही खपवून घेणार नसल्याचे म्हटले आहे. (Chhaava Controversy Minister Uday Samant clarified the government position)
उद्योग मंत्री उदय सामंत यांनी X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर छावा चित्रपटाबाबत निर्माण झालेल्या वादावर भाष्य केले आहे. त्यांनी सरकारची भूमिका मांडताना म्हटले आहे की, “धर्मरक्षक, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित हिंदी चित्रपट बनणे ही आनंदाची गोष्ट आहे. छत्रपतींचा इतिहास जगाला समजावा यासाठी असे प्रयत्न आवश्यक आहे. मात्र या चित्रपटात काही आक्षेपार्ह दृश्ये असल्याबाबत अनेकांनी मते व्यक्त केली आहेत. हा चित्रपट तज्ज्ञ आणि जाणकारांना आधी दाखवण्यात यावा त्याशिवाय प्रदर्शित करू नये, अशी आमची भूमिका आहे. महाराजांच्या सन्मानाला बाधा पोहोचेल, अशी कुठलीही गोष्ट खपवून घेतली जाणार नाही. चित्रपटाच्या निर्माते आणि दिग्दर्शकांनी तातडीने याबाबत उपाययोजना करून आक्षेपार्ह काही असेल तर काढून टाकले पाहिजे अशी आमची भूमिका आहे. चित्रपट पाहून पुढील निर्णय घेतला जाईल, त्याशिवाय हा चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही!” असे त्यांच्याकडून या पोस्टच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आले आहे.
धर्मरक्षक,स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित हिंदी चित्रपट बनणे ही आनंदाची गोष्ट आहे, छत्रपतींचा इतिहास जगाला समजावा यासाठी असे प्रयत्न आवश्यक आहे. मात्र या चित्रपटात काही आक्षेपार्ह दृश्ये असल्याबाबत अनेकांनी मते व्यक्त केली आहेत. हा चित्रपट तज्ज्ञ आणि…
— Uday Samant (@samant_uday) January 25, 2025
या ट्रेलरबाबत माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी सुद्धा आक्षेप घेतला होता. त्यांनी याबाबत म्हटले की, “छावा सिनेमाचे दिग्दर्शक लक्ष्मण उत्तेकर यांची संपूर्ण टीम मला मुंबईत भेटली होती. त्यांनी मला हा ट्रेलर दाखवला होता. पण, मी त्यांना सांगितले होते की मला संपूर्ण चित्रपट पाहायचा आहे. इतिहासाकारांचे आपण मते घेऊयात. म्हणजे काही दुरुस्ती असेल ती करून छत्रपती संभाजी महाराजांवरचा हा सिनेमा संपू्र्ण जगभरात पोहोचू शकतो. पण, त्यांच्याकडून अद्याप काही प्रतिसाद आलेला नाही.” असे त्यांनी सांगितले. “आपल्याला ट्रेलरमध्ये छत्रपती संभाजी महाराज हे लेझीम खेळताना आणि डान्स करताना दिसत आहेत. लेझीम हा आपला सांस्कृतिक ठेवा असून लेझीम खेळणे चुकीचे नाही. पण, ते गाण्याच्या स्वरुपात आनंदोत्सव साजरा करत असताना ही सिनेमॅटिक लिबर्टी कितपत योग्य? यावर चर्चा करणे गरजेचे आहे.” असा सल्ला त्यांनी यावेळी दिला.
हेही वाचा… Elvish Yadav : युट्युबर एल्विश यादववर कोर्टाकडून FIR दाखल करण्याचे आदेश जारी
बुधवारी, 22 जानेवारीला मुंबईत ‘छावा’ या बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित सिनेमाचा ट्रेलर लॉन्च सोहळा मोठ्या ग्रँड पद्धतीने पार पडला. ज्यासाठी सिनेमातील मुख्य स्टारकास्ट आणि मेकर्सची पूर्ण टीम उपस्थित होती. युट्युबवर ‘छावा’ या सिनेमाचा ट्रेलर नंबर 1 वर ट्रेंडिंगमध्ये आहे. प्रेक्षकांनीदेखील या ट्रेलरला चांगली पसंती दिली आहे. एकूण 3 मिनिट 8 सेकंदाचा हा ट्रेलर तुम्हाला एक क्षणसुद्धा डोळे मिटून देणार नाही. अंगावर शहारे आणणारे प्रसंग आणि मनाला भिडणारे संवाद या ट्रेलरचे मुख्य आधार आहेत. परंतु, या ट्रेलरमध्ये शंभूराजे आणि येसुबाई यांचे लेझीम नृत्य दाखवण्यात आल्याने यावर अनेकांनी आक्षेप घेतला आहे. त्यामुळे चित्रपट निर्माते, दिग्दर्शक याबाबत आता नेमका काय निर्णय घेतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.