पुणे : नुकतेच बहुचर्चित ‘छावा’ सिनेमाचा एक ट्रेलर प्रदर्शित झाला. अभिनेता विकी कौशलने यामध्ये छत्रपती संभाजीराजे महाजारांची भूमिका साकारली आहे. तर मराठमोळा लक्ष्मण उत्तेकर याने या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर एकीकडे सर्वांनी कौतुक केले, तर काहींनी यामध्ये दाखवलेल्या दृश्यांवर आक्षेप नोंदवला आहे. आता मराठा क्रांती मोर्चाकडून यातील काही दृश्यांना विरोध केला आहे. चित्रपटाच्या विरोधात आता पहिली ठिणगी पडली असून आता याबाबत माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आपली भूमिका मांडली आहे. (Chhaava Movie 2025 Sambhajiraje Chhatrapati on scenes from movie)
हेही वाचा : Sanjay Raut On Shinde : हे तर वेश्येचे राजकारण, संजय राऊत यांची सडकून टीका
माजी खासदार संभाजीराजे छत्रपती म्हणाले की, “छावा सिनेमाचे दिग्दर्शक लक्ष्मण उत्तेकर यांची संपूर्ण टीम मला मुंबईत भेटली होती. त्यांनी मला हा ट्रेलर दाखवला होता. पण, मी त्यांना सांगितले होते की मला संपूर्ण चित्रपट पाहायचा आहे. इतिहासाकारांचे आपण मते घेऊयात. म्हणजे काही दुरुस्ती असेल ती करून छत्रपती संभाजी महाराजांवरचा हा सिनेमा संपू्र्ण जगभरात पोहोचू शकतो. पण, त्यांच्याकडून अद्याप काही प्रतिसाद आलेला नाही.” असे त्यांनी सांगितले. “आपल्याला ट्रेलरमध्ये छत्रपती संभाजी महाराज हे लेझीम खेळताना आणि डान्स करताना दिसत आहेत. लेझीम हा आपला सांस्कृतिक ठेवा असून लेझीम खेळणे चुकीचे नाही. पण, ते गाण्याच्या स्वरुपात आनंदोत्सव साजरा करत असताना ही सिनेमॅटिक लिबर्टी कितपत योग्य? यावर चर्चा करणे गरजेचे आहे.” असा सल्ला त्यांनी यावेळी दिला.
“छत्रपती संभाजी महाराजांवर हिंदीमध्ये सिनेमा काढण्यासाठी 100 ते 200 कोटी खर्च करण्याचे धाडस त्यांनी दाखवले. पण, हे चांगल्या पद्धतीने संपूर्ण जगात पोहोचले तर कौतुकास्पद आहे. माझी लक्ष्मण उत्तेकर यांना विनंती आहे की इतिहासकार आणि या विषयातील जाणकार व्यक्तींसोबत चर्चा करावी,” असाही सल्ला यावेळी माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी दिला आहे. त्यामुळे आता हा वाद पेटण्याची शक्यता आहे. दरम्यान, बहुचर्चित छावा हा सिनेमा येत्या 14 फेब्रुवारीला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. यामध्ये विकी कौशल छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे. तर, अभिनेत्री रश्मिका मंदाना महाराणी येसूबाईंची भूमिका साकारणार आहे. तसेच या सिनेमात संतोष जुवेकर, सुव्रत जोशी यांच्यासह अनेक मराठी कलाकारांची फौजही दिसणार आहे.