Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र शरद पवार धमकी प्रकरणावरून छगन भुजबळ राज्य सरकारवर संतापले, म्हणाले...

शरद पवार धमकी प्रकरणावरून छगन भुजबळ राज्य सरकारवर संतापले, म्हणाले…

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना आज पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणी आता राजकीय स्तरांतून तीव्र प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते छगन भुजबळ यांनी देखील या प्रकरणी संताप व्यक्त केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना आज पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. सुप्रिया सुळे यांना व्हॉट्सअपच्या माध्यमातून तर फेसबुकवर “शरद पवार तुमचा दाभोलकर होणार” असे पोस्ट करत धमकी देण्यात आली. यानंतर तत्काळ राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पक्षाच्या शिष्टमंडळासह मुंबईच्या पोलीस आयुक्तांची भेट घेतली. तर या प्रकरणी योग्य ती कारवाई करत आम्हाला न्याय मिळावा, अशी मागणी सुप्रिया सुळे यांच्याकडून करण्यात आलेली आहे. या प्रकरणी आता राजकीय स्तरांतून तीव्र प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते छगन भुजबळ यांनी देखील या प्रकरणी संताप व्यक्त केला आहे. तर ज्यांनी दाभोलकर, कलबुर्गी, पानसरे, गौरी लंकेश यांची हत्या केली, त्यांचेच हे काम असल्याचे थेट आरोप त्यांच्याकडून करण्यात आलेला आहे.

हेही वाचा – शरद पवारांना जीवे मारण्याची धमकी, सुप्रिया सुळेंनी घेतली मुंबई पोलीस आयुक्तांची भेट

- Advertisement -

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत छगन भुजबळ म्हणाले की, शरद पवार किंवा राऊत बंधूंना धमकी देणे हे अत्यंत संतापजनक आहे. ही गोष्ट काळजीची पण आहे. कारण या महाराष्ट्रात आत्तापर्यंत दाभोलकर, पानसरे पलिकडच्या राज्यात कलबुर्गी, गौरी लंकेश या सगळ्यांच्या काही मनोवृत्तींनी हत्या केली आहे. दुर्दैव असे आहे की, भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकार अद्यापही याच्या मुळाशी जाऊ शकलेले नाही. त्यामुळे या घटनांच्या मुळाशी जाऊन शोधून काढले तर हे सगळं संपेल, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.

परंतु सरकार काही ठोस पावले उचलत नसल्याने काही “घटकांकडून” धमकी देण्यात येत आहे. या घटकांनी याआधी दिलेल्या धमक्या खऱ्या केल्याने याबाबतची काळजी वाटत आहे. पण या धमक्यांना शरद पवार आणि राऊत बंधू भीक घालणारे नाहीत. त्यामुळे सर्वसमावेशक विचारांची मांडणी करणाऱ्यांची काही ‘घटकांकडून’ संपवण्याचे काम सुरु आहे आणि म्हणूनच भारत सरकारने याचा गंभीरपणे विचार करणे गरजेचे आहे, असे छगन भुजबळ यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

- Advertisement -

ज्यांनी दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश यांची हत्या केली, त्यांच्याकडूनच अशा प्रकारच्या धमक्या देण्यात येत आहेत, असा थेट आरोप देखील भुजबळ यांच्याकडून करण्यात आलेला आहे. त्यामुळे या सर्व प्रकरणांमध्ये वरवर कारवाई न करता याच्या मुळाशी जाऊन कारवाई करणे गरजेचे आहे. कारण या प्रकरणांच्या मुळाशी जाऊन कारवाई करण्यात न आल्याने या घटकांची हिंमत वाढली असल्याचेही छगन भुजबळ यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

- Advertisment -