ओबीसींच्या राजकीय आरक्षणाला भाजपकडून अडथळे – छगन भुजबळ

विरोधी पक्ष म्हणून OBC आरक्षणासाठी पाठींबा द्यायचा आणि दुसरीकडे त्यांच्याच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी विरोधात याचिका करायची, असा भाजपचा दुहेरी डाव सुरू आहे. भाजप नेत्यांच्या अशा पावित्र्यामुळे महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचेही नुकसान होत आहे

Chhagan Bhujbal criticizes BJP over OBC reservation
Chhagan Bhujbal criticizes BJP over OBC reservation

ओबीसींच्या राजकीय आरक्षणाला भाजपकडून अडथळे आणले जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे. राहुल वाघ आणि विकास गवळी यासारखे लोक OBC आरक्षणाला बाधा येईल अशी कृती करत आहेत. त्यांनी कोर्टात याचिका दाखल करून संपूर्ण प्रक्रिया लांबवली आहे. हे लोक भाजपचे पदाधिकारी आहे, असा आरोप मंत्री छगन भुजबळ यांनी केला आहे.

ते पुढे म्हणाले एकीकडे विरोधी पक्ष म्हणून OBC आरक्षणासाठी पाठींबा द्यायचा आणि दुसरीकडे त्यांच्याच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी विरोधात याचिका करायची, असा भाजपचा दुहेरी डाव सुरू आहे. भाजप नेत्यांच्या अशा पावित्र्यामुळे महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचेही नुकसान होत आहे, असे छगन भजबळ म्हणाले.

ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने राज्य मागास आयोगाची भेट घेतली. यावेळी सुप्रीम कोर्टाने ओबीसी आरक्षण रद्द केले नाही. सुप्रीम कोर्टाला आरक्षणाबाबत निर्णय घेण्यासाठी इम्पेरिकल डेटा हवा आहे. त्यासाठी दोन महिन्यांची मुदत देण्यात आली होती. त्यापैकी आता एक महिना झाला असून अधिकारी त्यावर काम करत असल्याचे भुजबळ यांनी सांगितले. इम्पेरिकल डेटा लवकरच उपलब्ध करून द्यावी अशी मागणी केली असल्याचे भुजबळ यांनी सांगितले.

दरम्यान ओबीसी आरक्षणासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीदेखील सरकारची मदत केली आहे. भाजपच्या पदाधिकाऱ्यांना आवरण्याची विनंती करणार असल्याचे भुजबळ यांनी सांगितले. राज्यातील ओबीसी आरक्षणाचा तिढा न सुटल्यास त्या जागेवर आम्ही ओबीसी उमेदवार देण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही भुजबळांनी स्पष्ट केले.