नाशिक : मराठी अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला आहे. छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याहून पेटाऱ्यात बसून नव्हे, तर लाच देऊन सुटले होते, असं विधान सोलापूरकर यांनी केले आहे. सोलापूरकर यांनी केलेल्या विधानावर राष्ट्रवादी काँग्रेसचे ( अजितदादा पवार ) ज्येष्ठ नेते, छगन भुजबळ संतापले आहे. कोण आहेत ही लोक? असा सवाल भुजबळ यांनी उपस्थित केला आहे. ते नाशिकमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.
छगन भुजबळ म्हणाले, “काय यार लोकांना वेड लागलंय की काय लागले आहे? ही लोक कोण आहेत? औरंगजेबाचे देशावर राज्य होते. त्याला कोण लाच देऊ शकते? वाटेल ते विधान करतात. छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याच्या तुरूंगातून मोठ्या शिताफीने सुटले आहेत. शिवाजी महाराज यांनी वेगवेगळ्या क्लुप्त्या वापरून स्वराज्य निर्माण केले. आग्र्याहून सुटका हा त्यातील एक रणनीतीचा भाग आहे.”
“लाच देऊन शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज आले असते, तर आरामात घोड्यावरून आले असते. पण, शिवाजी महाराज यांनी संभाजी महाराज यांना काशीत कुणाच्यातरी ताब्यात दिले. शिवाजी महाराज एकटे पुढे आले. रायगडावर शिवाजी महाराज आल्यावर जिजामाता यांनी, ‘शंभुराजे कुठे आहेत?’ अशी विचारणा केली होती. तेव्हा जिजामाता यांच्या डोळ्यात पाणी आले होते. हा इतिहास आहे. हा इतिहास बदलणारे तुम्ही आम्ही कोण?” असा प्रश्न भुजबळ यांनी उपस्थित केला आहे.
मागासवर्गीय समाजाचा कार्यकर्ता हे पद सर्वांत मोठे
“मला राज्यपालपदाची ऑफर देण्यात आली नाही. मी सर्वसामान्य आणि मागासवर्गीयांमध्ये काम करणारा कार्यकर्ता आहे. त्यांच्यावर संकट आल्यानंतर मला पुढे राहून लढावे लागते. राज्यपालसारखी पद घेतल्यावर मी कोणासाठी भांडू शकणार नाही. मला पदापेक्षा मागासवर्गीय समाजाचा कार्यकर्ता हे पद सर्वांत मोठे आहे,” असं भुजबळ यांनी सांगितलं.
राहुल सोलापूरकर यांचे विधान काय?
“शिवाजी महाराज यांच्या काळात पेटारे-बिटारे, असं काहीच नव्हते. शिवाजी महाराज चक्क लाच देऊन आग्र्याहून सुटून महाराष्ट्रात आले होते. त्यासाठी त्यांनी किती हुंडी वटवल्या, याचे पुरावे देखील आपल्याकडे आहेत. शिवाजी महाराज यांनी अगदी औरंगजेबाचा वजीर आणि त्याच्या बायकोला देखील लाच दिल्याचे पुरावे इतिहासात आहेत. मोहसीन खान की मोईन खान नावाच्या सरदाराकडून सही-शिक्क्याचं अधिकृत पत्र महाराजांनी घेतलं होतं. त्याच्याकडून घेतलेला परवाना दाखवून शिवाजी महाराज आग्र्यातून बाहेर पडले. सर्वात शेवटी स्वामी परमानंद पाच हत्ती घेऊन आग्र्यातून बाहेर पडले. त्याची खुण आणि पुरावे देखील आहेत. परमानंदांकडे देखील परवानगी होती. मात्र, हा सगळा इतिहास गोष्ट स्वरुपात सांगायचा म्हटलं की, थोडे रंग भरून सांगावा लागतो. पण, रंजकता आली की, इतिहासाला छेद दिला जातो…,” असं राहुल सोलापूरकर यांनी एका पॉडकास्टला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते.