घरमहाराष्ट्रछगन भुजबळ राष्ट्रवादीमध्येच राहणार - सुप्रिया सुळे

छगन भुजबळ राष्ट्रवादीमध्येच राहणार – सुप्रिया सुळे

Subscribe

पुणे महापालिकेत आयोजित कार्यक्रमात पत्रकारांशी संवाद साधताना खासदार सुप्रिया सुळे यांनी नेत्यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी का दिली त्यामागील कारणे सांगितली.

ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे राष्ट्रवादीमध्येच राहतील असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला आहे. पुणे महापालिकेत आयोजित कार्यक्रमात त्या आल्या होत्या. यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना त्यांनी उत्तरे दिली. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीला सोडून गेलेल्या नेत्यांनी कोणत्या कारणास्तव पक्ष सोडला हेसुद्धा सांगितले.

दरम्यान पत्रकारांशी संवाद साधताना खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “इंदापूर विधानसभा मतदारसंघाविषयी काँग्रेस आघाडीच्या जागा वाटपाच्या चर्चेत निर्णय झाला नाही. हर्षवर्धन पाटील यांनी केलेले आरोप धक्कादायक आहेत,” असे विधान खासदार सुप्रिया सुळे यांनी येथे केले. इंदापुरची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सोडण्यात आल्याचे वृत्त मिळाल्यानंतर पाटील यांनी बुधवारी त्यांच्या समर्थकांचा मेळावा घेतला. त्यांनी शरद पवार, अजित पवार यांच्यावर आरोप करीत थेट आव्हान दिले आहे. पुणे महापालिकेत एका कार्यक्रमाच्या निमित्ताने आलेल्या सुप्रिया सुळे यांना पत्रकारांनी यासंदर्भात विचारले. तेव्हा सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “इंदापुरची जागा राष्ट्रवादी लढवणार की काँग्रेसला सोडली जाणार, यासंदर्भात अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. तरीही पाटील यांनी केलेले आरोप हे आमच्यासाठी धक्कादायक आहेत. पाटील यांच्याशी मी कालपासून संपर्क करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यांचा फोन बंद असून, जबाबदार व्यक्तीकडे मी निरोप पाठविला आहे. त्यांच्याशी माझा संपर्क होईल.”

- Advertisement -

मुलांसाठी नेत्यांनी मानहानी पत्करणे हे दुर्दैवी

पक्ष सोडून जाणाऱ्यांची पवार कुटूंबातील नाराजीमुळे नेत्यांनी पक्षांतर केले नसून साखर कारखाना, बँक, ईडी चौकशी अशी वेगवेगळी कारणे त्यामागे आहेत. जे गेले त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेससाठी काम केले आहे. त्यांच्यावर मी नाराज नाही. जे जात आहेत, त्यांना माझ्या शुभेच्छा. वडिलांना भाजपने प्रवेश नाकारल्याचे ऐकायला मिळाले. वडिलांचा अवमान झालेला असतानाही हे नेते भाजपमध्ये गेले. ४०-४० वर्ष एका पक्षात राहिलेल्या आणि विचारांशी बांधील असलेल्या ज्येष्ठ नेत्यांना मुलांसाठी मानहानी पत्करावी लागते. हे दुर्दैव आहे’’, असेही त्या यावेळी म्हणाल्या.

घंटा गाड्यांचे लोकार्पण

खासदार सुळे यांच्या खासदार निधीतून खडकवासला विधानसभा मतदारसंघातील विविध प्रभागातील कचरा गोळा करण्यासाठी तीन घंटा गाड्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या गाड्यांचे लोकार्पण आज महापालिकेत झाले. आयुक्त सौरभ राव यांच्याकडे या गाडया सुपूर्द केल्या गेल्या. यावेळी विरोधी पक्षनेते दिलीप बराटे, शहराध्यक्ष चेतन तुपे, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष विशाल तांबे, महिला विभागाच्या अश्विनी पोकळे आदी उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -