Wednesday, May 31, 2023
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र छत्रपती संभाजी महाराज स्वराज्यरक्षक की धर्मवीर? राज्याभिषेक दिनानिमित्त नेत्यांचे परस्परविरोधी ट्वीट

छत्रपती संभाजी महाराज स्वराज्यरक्षक की धर्मवीर? राज्याभिषेक दिनानिमित्त नेत्यांचे परस्परविरोधी ट्वीट

Subscribe

मुंबई – छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नसून स्वराज्यरक्षक होते, असा मोठा दावा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला होता. यावरून राज्यभरात गदारोळ झाला. अजित पवारांनी माफी मागावी याकरता भाजपाने आंदोलनही पुकारले. मात्र, अजित पवार आपल्या वक्तव्यावर ठाम राहिले. तसंच, आज छत्रपती संभाजी महाराज यांचा ३४३ वा राज्याभिषेक दिन आहे. यानिमित्ताने भाजपा आणि राष्ट्रवादी नेत्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र, मध्यंतरी स्वराज्यरक्षक आणि धर्मवीरवरून रंगलेला वाद दोन्ही पक्षाच्या नेत्यांच्या शुभेच्छांमधून दिसून येतोय.

छत्रपती संभाजी महाराज स्वराज्यरक्षक होते, यावर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार ठाम आहेत. त्यामुळे त्यांनी राज्याभिषेक सोहळा दिनानिमित्त शुभेच्छा देताना महाराजांचा उल्लेख स्वराज्यरक्षक असाच केला आहे. ते म्हणतात की, “छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेलं रयतेचं राज्य हे शत्रूंच्या हल्ल्यांपासून सुरक्षित राहावं यासाठी आपल्या प्राणांची बाजी लावणारे महाप्रतापी,महापराक्रमी,प्रकांड पंडित,स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांना ‘राज्याभिषेक दिना’च्या निमित्तानं त्रिवार अभिवादन आणि मानाचा मुजरा!”

- Advertisement -


धर्मवीरवरून झालेल्यावर वादावर शरद पवारांनी अजित पवारांचं समर्थन केलं होतं. त्यांचं हे समर्थन त्यांनी आज दिलेल्या शुभेच्छांवरूनही अधोरेखित झालं आहे. “आपले अतुलनीय साहस आणि धैर्याने स्वराज्यावर आक्रमण करणाऱ्या शत्रूविरोधात छत्रपती संभाजी महाराज यांनी कडवी झुंज दिली. स्वराज्य निष्ठेसाठी आपल्या प्राणांचे बलिदान देणारे स्वराज्य रक्षणकर्ते छत्रपती संभाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन!”, असं शरद पवार म्हणाले आहेत. स्वराज्यरक्षक आणि धर्मवीर या वादात न पडता त्यांनी स्वराज्य रक्षणकर्ते असा शब्दप्रयोग केला आहे. अजित पवारांच्या स्वराज्यरक्षक आणि शरद पवारांच्या स्वराज्य रक्षण या दोन्ही शब्दांचा अर्थ सारखाच होतो. त्यामुळे राष्ट्रवादी पक्ष आपल्या वक्तव्यावर ठाम असल्याचं पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे.


दरम्यान, छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर होते, असा दावा भाजपाकडून करण्यात येतोय. अजित पवारांनी केलेल्या वक्तव्याविरोधात भाजपाने त्यांच्याविरोधात आंदोलन पुकारले होते. अजित पवारांनी माफी मागावी याकरता भाजापाने महाराष्ट्रभर आंदोलन पुकारले होते. आताही त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांचा उल्लेख धर्मवीर असा केला आहे.

- Advertisement -

भाजपा नेते नितेश राणे यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, “धर्मवीर”छत्रपती संभाजी महाराज यांच्या ३४३ व्या राज्याभिषेक सोहळ्याच्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा !! एवढंच नव्हे तर नितेश राणे यांनी धर्मवीर या शब्दाला अवतरण चिन्ह दिले आहे. म्हणजेच, त्यांनी धर्मवीर या शब्दावर ठाम असल्याचं जाहीर केलं आहे.


ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनीही छत्रपती संभाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त शुभेच्छा देताना महाराजांचा उल्लेख धर्मवीर असाच केला आहे.


भाजपाचे नेते चंद्रकांत पाटील यांनीही ट्वीट करत म्हटलं आहे की, हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज यांचा आज राज्याभिषेक दिन! धैर्य, शौर्य, चातुर्य, बुद्धिमत्ता यांनी त्यांचे चरित्र सदैव तेजाने झळाळत आहे. राजकारण, समाजकारण, अर्थकारण, धर्म, भाषा अशा अनेक क्षेत्रांत त्यांचे कर्तृत्व प्रेरणा देत राहील. त्रिवार मानाचा मुजरा!, म्हणजेच, पाटील यांनीही त्यांचा उल्लेख धर्मवीर असा केला आहे.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -