छत्रपती संभाजीनगर : तू मला ओळखले नाही का? बुढ्ढे तेरे को ड्युटी करनी आती है क्या.. असे म्हणत एका मुजोरड्या बिल्डरने पोलिसांवर अरेरावी केल्याची घटना उघडकीस आली आहे. छत्रपती संभाजीनगरात घडलेल्या या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. रविवारी (ता. 26 जानेवारी) संभाजीनगरात घडलेल्या या घटनेनंतर कानाकोपऱ्यातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. या मुजोर बिल्डरचे नाव कुणाल बाकलीवाल असे असल्याची माहिती समोर आली आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी सुद्धा वेळ वाया न घालवता या मुजोर बिल्डर कुणाल बाकलीवाल याला धडा शिकवला आहे. (Chhatrapati Sambhaji Nagar Builder Kunal Bakliwal was arrested by police)
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओनुसार, छत्रपती संभाजीनगर शहरातील मिल कॉर्नर चौकात रविवारी काळ्या चार चाकी डिफेंडर कारमध्ये कुणाल बाकलीवाल या बिल्डरने हॉर्न आणि सायरन वाजवून चारचाकी मुद्दाम रस्त्याच्या मधोमध उभी केली. यावेळी पोलिसांनी त्याला थांबवल्यानंतर त्यांने त्यांच्यासोबतच वाद घातला. यावेळी त्याने थेट पोलिसांना शिवीगाळ करत ‘साहेबांशी बोल’ म्हणत त्यांच्यासमोर फोन सरकवला. पोलिसांना ‘गप्प बस’ म्हणत दोन तासात तुम्हाला सस्पेंड करेन अशी धमकी दिली. दरम्यान एका बुलेट स्वारावर मॉडीफाय सायलेन्सर ची कायदेशीर कारवाई करत असताना कुणाल बाकलीवालने गाडीमध्ये घालत दरवाजा उघडून बुलेट स्वराच्या हातावर धक्का दिला.
हेही वाचा… Walmik Karad : कराडवर उपचार करणाऱ्या डॉ. थोरातांबद्दल दमानियांचे सवाल; सुरेश धसांनी केली पाठराखण
यावेळी कुणाल बाकलीवालने पोलिसांना गाडीतून खाली उतरायलाही नकार दिला. इतकेच नाही तर त्याने म्हटले की, “साहेबांना बोल, मला ओळखत नाही का? दोन तासांत तुम्हाला सस्पेंड करतो,” अशी धमकी दिली. गाडीतूनच माजोरड्या बाकलीवालने पोलिसांना गप्प बसण्यास सांगितले होते. याचवेळी पोलिसांनी हा सर्व प्रकार मोबाइलमध्ये रेकॉर्ड केला. त्यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. मात्र, हे लक्षात येऊनही त्याचा माज कमी झाला नाही. “जनतेच्या पैशातून पगार मिळतो, पण तुम्ही जनतेलाच वागवता का?” असे सांगत त्याने एका मोठ्या व्यक्तीचा फोन पोलिसांकडे दिला होता. ज्यानंतर पोलिसांनी त्याच्यावर कारवाई करत त्याला ताब्यात घेतले आहे.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलीस या सगळ्या प्रकारावर गप्प का होते असा सवाल नेटकऱ्यांनी उपस्थित केला. त्यानंतर मात्र पोलिसांनी 24 तासांच्या आत तपासाची चक्र फिरवली. या प्रकरणी पोलिसांनी कुणाल बाकलीवार विरोधात क्रांती चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पेशाने बिल्डर असणाऱ्या कुणाल बाकलीवालचे अनेक राजकीय नेत्यांशी संबंध असल्याचे समोर आले आहे. कुणाल डिफेंडर गाडी वापरत असल्याचेही समोर आल्यानंतर पोलिसांनी या उर्मट माजोरड्या कुणालला गुडघ्यावर बसवले. त्याची गाडी जप्त करत पोलिसांनी त्याच्यावर भारतीय न्याय संहिता कलम 132, 352, 351 (2) सह मोटर वाहन कायदा 1988 चे कलम 100(2), 177, 119 (2) 177 प्रमाणे कायदेशीर फिर्यादी अंतर्गत पुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक तनपुरे करत आहेत.