छत्रपती संभाजीनगर : अजित पवार (Ajit Pawar) आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील (NCP) 8 आमदारांनी बंडखोरी करत 2 जुलै रोजी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रीपदाची शपथ घेतली. यानंतर महाविकास आघाडीच्या (MVA) नेत्यांकडून त्यांच्यावर टीका होताना दिसत आहे. या टिकेला आता अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. अजित पवार यांनी महाराष्ट्राचा विकासासाठी निर्णय घेतला. या निर्णयाची ‘इंडिया’ (INDIA) आघाडीतील घटकपक्षांनीही देखील दखल घेतली आहे, असे सुनील तटकरे म्हणाले. (Ajit Pawars decision for development India alliance also took notice Attack by Sunil Tatkare)
छत्रपती संभाजीनगरमध्ये आयोजित अजित पवार गटाच्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना सुनील तटकरे म्हणाले की, अजित पवार यांनी घेतलेल्या निर्णयामुळे एक नवीन चैतन्य निर्माण झाले आहे. आम्ही देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखालील एनडीएमध्ये (NDA) सहभागी झालो आहोत. राज्यातील सरकारमध्ये आम्ही सहभागी झालो आहोत, असे सुनील तटकरे म्हणाले.
हेही वाचा – Eknath Shinde : मविआच्या काळात यंत्रणाचा दुरुपयोग, खोटे आरोप करून…; मुख्यमंत्र्यांचा गौप्यस्फोट
‘इंडिया’ आघाडीने अजित पवारांच्या निर्णयाची घेतली दखल
विरोधकांवर टीका करताना सुनील तटकरे म्हणाले की, अजित पवार यांनी घेतलेल्या निर्णयाची ‘इंडिया’ (INDIA) आघाडीतील घटकपक्षांनीही दखल घेतली आहे. आम्ही आमच्या मूळ विचारावर ठाम आहोत. अजित पवारांनी महाराष्ट्राचा विकास करण्यासाठी निर्णय घेतला आणि खुर्चीसाठी नाही. पण आमच्यावर वेगवेगळ्या बैठकांमध्ये टीका-टिप्पणी केली जाते. मात्र राज्यातील जनता अजित पवारांकडे विश्वासार्ह नेतृत्व म्हणून बघते. त्यामुळे अजित पवारांवर टीका करणाऱ्यांना येणाऱ्या काळात महाराष्ट्राची जनता उत्तर देईल, असेही तटकरे म्हणाले.
अजित पवारांवर टीका करण्याचा विरोधकांना नैतिक अधिकार
शिवसेना आणि भाजपावर युतीवर बोलताना सुनील तटकरे म्हणाले की, आम्ही दीर्घकाळापासून त्यांना वैचारिक लढाई देत आलो आहोत. 2019 मध्ये आम्ही भाजपा- शिवसेना युतीविरोधात लढलो, तेव्हा महाराष्ट्राच्या जनतेने युतीला स्पष्ट कौल दिला होता. 2019 मध्ये दोन पक्षांची विचारधारा सारखी असणाऱ्या एका पक्षासोबत निवडणूक लढवली होती. आता 2023 मध्ये अजित पवारांनी दुसऱ्या पक्षासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे, यात चुकीचं काय? 2019 मध्ये टीका न करणाऱ्यांना आता टीका करण्याचा नैतिक अधिकार आहे का?, असे प्रश्नही सुनील तटकरे यांनी उपस्थित केले.
हेही वाचा – CBI Clean Chit : आज क्लिनचीट दिली तरी…; रश्मी शुक्ला प्रकरणी नाना पटोलेंचं मोठं वक्तव्य
लोकसभा निवडणुकीत 48 जागा मिळतील यासाठी करणार प्रयत्न
अजित पवाराचं नेतृत्व शब्दाचं आणि विचारांचं पक्कं आहे. मला सुद्धा उद्याच्या जाहीर सभेत काहीतरी बोलायचं आहे. उत्तर म्हणून नाही तर भूमिका मांडायची आहे. हा पहिलाच मेळावा आहे. यात अभुतपुर्व प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील सर्व 48 जागा महायुतीला मिळतील, असा प्रयत्न करायचा आहे, असेही तटकरे म्हणाले.