छत्रपती संभाजीनगर : मंत्री धनंजय मुंडे आणि सरपंच संतोष देशमुख हत्याकांडातील संशियत आरोप वाल्मिक कराडबाबात मराठा नेते, मनोज जरांगे-पाटील मोठा गौप्यस्फोट केला आहे. निवडणुकीआधी धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड भेटायला आले होते, असं जरांगे-पाटील यांनी म्हटले आहे. ते छत्रपती संभाजीनगर येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.
जरांगे-पाटील म्हणाले, “अनेक नेते, अंतरवाली सराटी येथे मला भेटण्यासाठी मला येत होते. मी रात्रंदिवस त्यांना भेटायचो, सन्मान करायचो. कधीही दुजाभाव केला नाही. अंतरवाली सराटी येथे भेटण्यासाठी यायचे म्हणून 8 दिवसांपासून मुंडेंकडून निरोप येत होता. रात्री 2 वाजता मला भेटायला आले होते.”
हेही वाचा : जरांगे-पाटील यांची मुख्यमंत्री फडणवीसांना वॉर्निंग; म्हणाले, ‘संयम सुटला तर मी…’
“धनंजय मुंडे आणि सरमाडा ( वाल्मिक कराड ) दोघेजण आले होते. धनंजय मुंडेंनी सरमाड्याची ओळख करून दिली. मी म्हटले, ‘हे आहे का, हार्वेस्टरचा पैसे बुडवणारा?’ त्यानंतर, ‘सहकार्य करा, लक्ष ठेवा. निवडणुकीचा काळ आहे, माझ्यावर अन्याय झाल्यावर मराठ्यांनी मला मोठे केले,’ असं धनंजय मुंडेंनी म्हटलं,” अशी माहिती जरांगे-पाटील यांनी दिली.
धनंजय मुंडे पाया पडले होते का? असा प्रश्न विचारल्यावर जरांगे-पाटील म्हणाले, “काही राजकीय आणि सामाजिक संकेत पाळले पाहिजेत. ते संकेत पाळणारा मी आहे. जिथे अन्याय झाला, तिथे लागेल त्या ताकदीने भिडण्याची माझी तयारी आहे. परंतु, काहींच्या इज्जतीचा प्रश्न आहे. मात्र, ती प्रक्रियाच आहे, तेव्हाच्या वेळेची…”
हेही वाचा : अर्थसंकल्पादिवशी मोदींनी जोरजोरात बाक वाजवण्यावरून राऊतांचा खोचक टोला, म्हणाले, ‘त्यांना…’