छत्रपती संभाजीनगर : मराठा समाजातील बीड, लातूर आणि सिल्लोड येथील तीन मुलांनी आत्महत्या केल्याचं समोर आले आहे. त्यामुळे मराठा नेते, मनोज जरांगे-पाटील हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर संतापले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना किती बळी पाहिजेत? तुम्हाला काहीच वाटत नाही का? तुमच्यामुळे आमच्या मुलांच्या आत्महत्या होत आहेत, असा आरोप जरांगे-पाटील यांनी केला आहे. ते छत्रपती संभाजीनगर येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.
जरांगे-पाटील म्हणाले, “आपल्याला न मिळणारे आरक्षण मिळाले आहे. कुणीही आत्महत्या करू नका. मला कुणाचीही गरज नाही. पण, मराठा बांधवांची खूप गरज आहे. एक टक्के कमी गुण मिळाले, तर चालेल. धाडसी बना. मात्र, आई-वडिलांपासून लांब जाऊ नका. आई-वडिलांना दुसरा कुणाचा आधार नाही.”
हेही वाचा : अर्थसंकल्पादिवशी मोदींनी जोरजोरात बाक वाजवण्यावरून राऊतांचा खोचक टोला, म्हणाले, ‘त्यांना…’
“बीड, लातूर आणि सिल्लोड येथील तरूणांनी आत्महत्या केली. यात तुमचा काहीही दोष नाही. तुम्ही नोकरी लागावी म्हणून स्वप्न पाहिलेली असतात. दुसऱ्याला कमी टक्केवारी असून नंबर लागला, माझा टक्केवारी असून नंबर लागला नाही. तुमची भावना योग्य आहे, परंतु नाईलाज आहे. त्यासाठी आरक्षण मिळेपर्यंत दोन वर्षे उशीर लागुद्या. तुम्ही आत्महत्या करू नका,” असं आवाहन जरांगे-पाटील यांनी तरूणांना केले आहे.
“मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना किती बळी पाहिजेत? तुम्हाला काहीच वाटत नाही का? दुसऱ्या कारणासाठी कुणाचा मृत्यू झाला, तर तुम्ही पुर्नवसन करता. हे तरूण भविष्यासाठी आरक्षण मागत आहेत. तुम्हाला माणुसकी आहे की नाही? मराठ्यांचे मुडदे नका पडून देऊ. संयम सुटला तर राज्यात वेगळे आंदोलन करावे लागेल. शेवटी जातीच्या लेकरांपेक्षा आम्हाला काहीही मोठे नाही,” असं जरांगे-पाटील यांनी म्हटले आहे.
“तुमच्या घरातील लेकरासारखे आमच्या घरातील लेकरू का समजत नाही? आमची लेकरे धडाधड संपत आहेत. एका आईचा मुलगा गेला, तरी तुम्हाला मराठ्यांविषयी दयामया येत नाही का?” असा सवाल जरांगे-पाटील यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना विचारला आहे.
“आम्ही केलेल्या मागण्या लगेच लागू करण्यात याव्यात. शिंदे समितीला कशासाठी बसवून ठेवले आहे? तुमच्यामुळे आमच्या मुलांच्या आत्महत्या होत आहेत. तुम्ही फक्त आरक्षण देतो सांगता आणि देत नाही. याचा अर्थ मराठा मुलांच्या आत्महत्येचं तुम्ही राजकारण करत आहात. आम्ही केलेल्या मागण्या तातडीने मार्गाला लावाव्यात. माझी माणसे आणि मुले मरायला लागले आहेत. अन्यथा मला उग्र आंदोलन करावे लागेल. जाणूनबुजून मराठ्यांना वेठीस धरू नका. संयम सुटला, तर मी सरकार-फिरकार बघणार नाही,” असा इशारा जरांगे-पाटील यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना दिला आहे.
हेही वाचा : फडणवीसांचे कुटुंब वर्षा बंगल्यात जायला घाबरते का? संजय राऊतांनी का केला असा सवाल