नितेश राणे करणार संजय राऊतांची चौकशी, हक्कभंग समितीतून ठाकरे गट आऊट

संग्रहित छायाचित्र

मुंबईः ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची चौकशी करण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकारने बुधवारी हक्कभंग समिती स्थापन केली. या समितीमध्ये नितेश राणे, सदा सरवणकर, संजय शिरसाठ हेही आहेत. नितेश राणे व राऊत यांच्यातून विस्तव जात नाही. तर सरवणकर व शिरसाठ हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेल्यानंतर राऊत यांनी त्यांच्यावर टीका करण्याची एकही संधी सोडली नाही. त्यामुळे समितीमधील या दोन नावांमुळे सर्वाच्याच भुवया उंचवल्या आहेत. विशेष म्हणजे या समितीचे अध्यक्ष भाजप आमदार राहुल कुल आहेत. तर या समितीमध्ये ठाकरे गटाच्या आमदाराला स्थान देण्यात आलेले नाही. परिणामी ही समिती राऊत यांची काय चौकशी करणार व त्यांना काय शिक्षा ठोठावणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

खासदार संजय राऊत यांनी विधिमंडळाबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर बुधवारी उशीरा विधानसभा हक्कभंग समिती गठीत करण्यात आली. संजय राऊत यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या हक्कभंग प्रस्तावावर  ही समिती निर्णय घेईल. या समितीमध्ये १५ सदस्यांचा समावेश असून  समितीच्या प्रमुखपदी राहुल कुल यांची निवड करण्यात आली आहे. या समितीत अतुल भातखळकर, योगेश सागर, अमित साटम, नीतेश राणे, अभिमन्यू पवार, संजय शिरसाठ, दिलीप मोहिते -पाटील, सदा सरवणकर, माणिकराव कोकाटे, सुनील भुसारा, नितीन राऊत, सुनील केदार, विनय कोरे, आशीष जयस्वाल या आमदारांचा सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे.

खासदार संजय राऊत यांनी विधिमंडळाबाबत  केलेल्या वक्तव्याचे तीव्र पडसाद आज विधानसभेत उमटले. सत्ताधारी आमदारांनी आक्रमक पवित्रा घेत राऊत यांच्या विरोधात हक्कभंग प्रस्ताव मांडला. सदस्यांचा आक्रमक पवित्रा पाहून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विधानसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब केले. कामकाज सुरू होताच विधान सभेत आशिष शेलार आणि अतुळ भातखळकर यांनी संजय राऊत यांच्याविरोधात हक्कभंग आणण्याची मागणी केली. विधान परिषदेतही यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमक भूमिका घेतली. यामुळे विधान सभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. संजय राऊतांच्या वक्तव्याची पडताळणी हक्कभंग समितीकडून केली जाईल. त्यानंतर, ८ मार्चला याबाबत निर्णय जाहीर केला जाईल, असे नार्वेकरांनी स्पष्ट केले. त्यानंतर रात्री उशीरा विधानसभा नवीन हक्कभंग समितीची स्थापना करण्यात आली.

 

हेही वाचाः संजय राऊतांवर खरंच हक्कभंग होईल का?