विधासनसभा निवडणुकीचा निकाल येण्यास काही तासांचा अवधी शिल्लक राहिला आहे. बऱ्याच एक्झिट पोलनं महायुतीच्या दिशेनं वारं फिरल्याचं सांगितलं आहे. तर, महाविकास आघाडीलाही सत्ता मिळणार असल्याचं काही एक्झिट पोलनं दर्शवलं आहे. मात्र, निकालाआधीच महायुतीत मुख्यमंत्रिपदावरून बिनसलं आहे.
“भाजपच्या कार्यकर्त्यांना शंभर टक्के देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत, असं वाटते,” असे विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं होतं. तर, महाराष्ट्रात अनेक ठिकाणी ‘अजितदादा पवार मुख्यमंत्री’ असं बॅनर लागले आहेत. यावरून शिवसेना शिंदे गटाचे नेते, संजय शिरसाट यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.
हेही वाचा : माहीममध्ये सरवणकरांना गुलिगत धोका! मतदानानंतर भाजपच्या नेत्याचा ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश
भाजप आणि राष्ट्रवादीला त्यांचा नेता मुख्यमंत्री व्हावा, असं वाटते, तर आम्ही थोडीच गप्प बसलेलो आहोत. आमच्याही कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत, असं वाटतं, अशी भूमिका संजय शिरसाट यांनी व्यक्त केली आहे. ते प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.
संजय शिरसाट म्हणाले, “माझ्या पक्षाचा नेता मुख्यमंत्री होऊ नये, असं माझं मत असते का? बावनकुळेंनी सांगितलं, ‘फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत.’ काही ठिकाणी अजितदादा मुख्यमंत्री व्हावेत, असे बॅनर लागलेत. मग, आम्ही थोडीच गप्प बसलेलो आहे? आमच्याही पक्षाच्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना वाटतं, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले पाहिजेत. त्यात काहीच गैर नाही.”
हेही वाचा : वाद चिघळला! “शरद कोळींची गाडी फोडल्यास सुशीलकुमार शिंदे अन् प्रणिती यांचं…”, ठाकरेंच्या नेत्याचा थेट इशारा