छत्रपती संभाजीराजे येणार सक्रिय राजकारणात

नाशिक : छत्रपती शिवाजी महाराज यांचे तेरावे वंशज आणि राजर्षी शाहू महाराज यांच्या कोल्हापूर गादीचे वारस संभाजी राजे छत्रपती यांनी सक्रीय राजकारणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. ते काँग्रेस, राष्ट्रवादी या पक्षात जाणार की स्वत:चा पक्ष स्थापन करणार याविषयी लवकरच घोषणा करणार आहेत.

संभाजी राजे छत्रपती यांच्या खासदारकीची मुदत २ मे २०२२ रोजी पूर्ण झाली आहे. त्यामुळे यापुढे राजकारणात सक्रिय राहण्याचा निर्णय राजेंनी घेतला आहे. याविषयी त्यांनी दिल्लीत पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. त्यामुळे नाशिकमधील त्यांचे समर्थक काय भूमिका घेतात, हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे. मराठा आरक्षणासह अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या विविध मागण्यांसाठी त्यांनी वेळोवेळी आंदोलन केले. त्यामुळे संभाजीराजे यांनी सामाजिक कार्यासह राजकारणातही सक्रिय होण्याचा निर्णय घेतला आहे.

नुकतेच नाशिकला येवून गेलेल्या संभाजीराजेंनी पालकमंत्री छगन भुजबळ यांची भेट घेवून ओबीसी व मराठा आरक्षणासंदर्भात सविस्तरपणे चर्चा केली होती. त्यामुळे संभाजीराजे छत्रपती हे राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याची जोरदार चर्चा होती. नाशिक लोकसभा मतदारसंघातून ते निवडणूक लढवणारअशीही चर्चा असताना त्यांनी ३ मे नंतर भूमिका स्पष्ट करण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे संभाजीराजे आता काय राजकीय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर राजेंनी व्यक्त केलेला हा मानस अक्षय राहील. महाराष्ट्राच्या भविष्यातील राजकारणाला वेगळी दिशा मिळणार आहे. त्यामुळे संभाजीराजे छत्रपती यांनी कुठलाही निर्णय घेतला तरी आम्ही त्यांच्या सोबत आहोत : करण गायकर, अध्यक्ष छावा क्रांतिवीर सेना”