मराठा आरक्षणसाठी उपोषण करणारे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना छत्रपती संभाजीनगर येथील रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. त्यावेळी त्यांनी माध्यांशी संवाद साधताना ओबीसी नेत्यांवर त्यांनी जोरदार निशाणा साधला आहे. ओबीसी नेत्यांच्या हट्टीपणामुळे मराठा आणि ओबीसी बांधवांमध्ये संभ्रम होत आहे अस त्यांनी म्हटलं आहे.
छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर जरांगे पाटील चितेपिंपळ येथे आले होते. त्यावेळी त्यांचे जोरदार स्वागत देखील करण्यात आले. त्यावेळी त्यांनी लोकांशी संवाद साधला. त्यावेळी बीडमधील मराठा समाजाच्या तरूणांना विनाकारण अडवलं जात आहे असं ही ते म्हणाले.
जरांगे पाटील यांचं उपोषण सुरू असताना काही ठिकाणी मराठा समाज आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. मराठा आरक्षणासाठी गेल्या काही दिवसांपुर्वी बीड आणि जालन्या जिल्ह्यामध्ये आंदोलने झाली. या आंदोलनाच्या वेळी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले. आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल केले.
राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळुंके आणि आमदार संदीप क्षीरसागर यांच्या कार्यालयात जाळपोळ करण्यात आली होती. नेत्यांच्या गाड्या देखील अडवण्यात आल्या होत्या. मात्र जाळपोळ करणारे हे मराठा आंदोलक नाही, असा दावा जरांगे पाटील यांनी केला.
बीडमधील मराठा समाजातील तरूणांना विनाकरण अडकवण्याचा प्रयत्न होत आहे असही जरांगे पटील म्हणाले. बीडमध्ये मराठा समाजातील युवकांवर होणारा अन्याय थांबवा, त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत, त्यांना विनाकरण अडकवलं जात आहे. हे सर्व सरकारने थांबवावे. बीडच्या घटनेचं राजकारण होत आहे, आणि गोरगरिबांची पोरं गुंतवली जात आहेत. हे सरकारने थांबावावे, नाही तर बीडमधील मराठा समाज रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिला आहे.
तुमच्याच अधिकाऱ्यांमुळे कायदा व सुव्यस्था भंग होऊ नये ही माझी तुम्हाल विनंती आहे, असा इशाराच मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिला आहे.