आग्र्यातील लाल किल्ल्यात शिवजयंतीचा उत्साह, ‘दिवाण-ए-आम’ शिवघोषाने निनादणार

Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2023 Shivaji Maharaj belong to Hindus only

राज्यसह देशभरातील शिवप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे, कारण दिल्लीतील ऐतिहासिक आग्रामधील लाल किल्ल्यात आज 19 फेब्रुवारी रोजी शिवजयंती साजरी होणार आहे. केंद्रीय पुरातत्व विभागाने यासाठी परवानगी दिली आहे. त्यामुळे आग्र्यातील लाल किल्ल्यातील दिवान ए आम सभागृहात छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, आग्र्यातील लाल किल्ल्यात 1666 मध्ये म्हणजे साडे तीनशेपेक्षा जास्त वर्षांपूर्वी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा औरंगजेबाने भेटण्यास नकार देत अपमान केला होता. मात्र याच लाल किल्ल्यातील दिवान ए आम सभागृहात यावर्षी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात भाग्य तमाम शिवप्रेमींना मिळतंय, ही सगळ्यांसाठी आनंदाची, अभिमानाची आणि भाग्याची गोष्ट आहे, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय सांस्कृतिक विभागाचे मंत्री जी किशन रेड्डी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि भारतीय पुरातत्व विभागाला धन्यवाद देत मनापासून त्यांचे आभार व्यक्त केले होते.

आग्रा किल्ल्याचा ‘दिवाण-ए-आम’ यंदा प्रथमच छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती उत्सवाच्या जयघोषाने निनादणार आहे. हा योग कित्येक दशकानंतर पहिल्यांदाच महाराष्ट्र शासन आणि सामाजिक संस्थांच्या पुढाकारामुळे जुळून आला आहे.

दरम्यान लाल किल्ल्यावरील या छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सवाला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्य, महाराष्ट्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित राहण्याची शक्यता आहे. यावेळी शिवाजी महाराजांच्या जीवनाचा वेध घेणारा भव्य दिव्य सांस्कृतिक कार्यक्रमही होणार आहे. औरंगाबादमधील अजिंक्य देवगिरी फाऊंडेशनचे अध्यक्ष विनोद पाटील आणि महाराष्ट्र सरकार संयुक्त विद्यमानाने या कार्यक्रमाचे आयोजन केलं जाणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांची ३९३ वी जयंती यावर्षी साजरी होत आहे. शिवछत्रपतींनी आग्रा येथील याच किल्ल्यात बाणेदारपणाचे दर्शन घडवले होते. अशा ‘दिवाण-ए- आम’ मध्ये शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्ताने त्यांचे स्मरण करण्याची संधी मिळाल्याने आग्रा किल्ल्याच्या आसमंतात शिवछत्रपतींचा जयजयकार घुमणार आहे. त्यादृष्टीने यंदाची शिवजयंती विशेष ठरणार आहे.

आग्रा किल्ल्याच्या ‘दिवाण-ए-आम’ सभागृहात ही जयंती साजरी करण्याची मागणी काही सामाजिक संस्थांनी केंद्र शासनाकडे केली होती, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने या संस्थांना परवानगी नाकारल्यानंतर दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्यात आली. त्यावर शिवजयंती सोहळा साजरा करण्यासाठी महाराष्ट्र शासन सहआयोजक असल्यास या किल्ल्यात शिवजयंती साजरी करण्यास परवानगी देण्याचे निर्देश न्यायालयाने भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाला दिले होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र शासनाचा सांस्कृतिक विभाग आणि पुरातत्व सर्वेक्षण विभागाला पत्र लिहून महाराष्ट्र शासन काही सामाजिक संस्थांच्या संयुक्त विद्यमाने शिवजयंती साजरी करणार असल्याचे कळविले, त्यानुसार भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने महाराष्ट्र शासनाला आग्रा किल्ल्याच्या ‘दिवाण-ए-आम’ सभागृहात यंदा प्रथमच छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्याची अनुमती दिली आहे.

या सोहळ्यामुळे मराठी जनतेला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आग्रा येथील ऐतिहासिक ठिकाणी साजरी करण्याची पर्वणी मिळणार आहे, याबद्दल मुख्यमंत्री शिंदे यांनी महाराष्ट्रातर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालय तसेच भारतीय पुरातत्व खात्याचेही आभार मानले आहेत.


देशात जूननंतर आर्थिक मंदीची शक्यता, जी-२० परिषदेच्या उद्घाटनानंतर राणेंचं सूचक विधान