मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना संवेदना आहेत की नाही ? : बाळासाहेब थोरात

राठोडांच्या शपथविधीनंतर पुजा चव्हाण प्रकरणावरून सवाल

maharashtra cabinet expansion pooja chavan grandmother slams shinde government over including sanjay rathod

नाशिक : पूजा चव्हाणप्रकरणात अडकलेल्या संजय राठोड यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आल्याने भाजपकडून घरचा आहेर मिळाल्यानंतर आता काँग्रेसनेही शिंदे-फडणवीस मंत्रीमंडळात राठोडांच्या सहभागावरून ताशेरे ओढले आहेत. महिलांबद्दल आपुलकी आहे की नाही? मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री संवेदनशील आहे की नाही ? याची खंत काँंग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली.

मंगळवारी (दि.९) नाशिक येथे विश्रामगृहावर थोरात यांनी पत्रकारांशी संवाद साधला. थोरात म्हणाले की, मंत्रिमंडळ तर झाले मात्र, महिलांचा समावेश तर सोडाच पण महिलांसंदर्भात आरोप असलेल्या व्यक्तिमत्त्वाला मंत्रीमंडळात सन्मानाने स्थान देणे योग्य नाही. आणखी एका मंत्र्यावर घोटाळ्यासंदर्भात आरोप झाले आहेत. त्याची शहानिशा झाली पाहिजे. मंत्रिमंडळ होणार की नाही?, याची भीती वाटत होती, कि हे दोघेच सरकार चालवणार की काय असे वाटत होते पण आता पहिला टप्पा का होईना झाला आहे. त्यामुळे या सरकारने महागाई कमी करण्यासाठी, बेरोजगारांना रोजगार मिळण्यासाठी काम करावे, अशी अपेक्षाही थोरात यांनी यावेळी व्यक्त केली.

आता दिल्ली वार्‍या थांबतील !

तब्बल दीड महिन्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारचे मंत्रिमंडळ स्थापन झाले आहे. त्यात १८ मंत्र्यांचा शपथविधी पार पडला आहे. त्यामुळे गेल्या महिनाभर अतिवृष्टी आणि नुकसान या संकटात होता, पण तुम्ही काही केले नाही. म्हणून आता तरी दिल्ली वार्‍या थांबतील आणि जनतेच्या हिताचे निर्णय घेतील, अशी अपेक्षा आहे. तसेच मुख्यमंत्री शिंदे यांनी शेतकर्‍यांच्या हिताचे निर्णय घेऊन कामकाज सुरु करावे, राज्यातील गोरगरिबांना न्याय द्यावा, यासाठी लवकरात लवकर कामकाज सुरु करणे आवश्यक असल्याचे माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.

उत्त्तर महाराष्ट्राची भरभराट होईल !

शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रीमंडळात उत्तर महाराष्ट्रातील पाच आमदारांची मंत्रीपदी निवड करण्यात आली आहे. उत्तर महाराष्ट्रात पाच मंत्री असून, आता उत्तर महाराष्ट्राची भरभराट होईल, सर्वसामान्यांचे प्रश्न सुटतील. तर राधाकृष्ण विखे-पाटील यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली, याकडे व्यक्तिशः व्यक्तिगत पाहत नाही. देशासह राज्यात ईडी आणि अन्य केंद्रीय तपास यंत्रणांचा त्रास सवार्ंनाच होत असून, याबाबत सर्वांनी एकत्र पद्धतीने लढल पाहिजे. विधान परिषद विरोधी पक्षनेते पदावर शिवसेनेने दावा केला असला, तरी आम्हाला ही जागा मिळावी, हा आमचा आग्रह असल्याचे बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.