खूशखबर! राज्य सरकार 75 हजार कर्मचाऱ्यांची करणार भरती, मुख्यमंत्र्यांची घोषणा

eknath shinde

औरंगाबाद – मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाचा 75 वा वर्धापन दिन साजरा होत आहे. त्यामुळे राज्य सरकारने 75 हजार कर्मचारी भरती करण्याचा निर्णय घेतल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले. ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात उभारण्यात आलेल्या शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या अनावरणानंतर नाट्यगृहात ते बोलत होते. ७५ हजार कर्मचाऱ्यांमध्ये प्राध्यापकांची भरती होणारच आहे. पुढे मुख्यमंत्र्यांनी जी पदे मंजूर आहेत, त्यांचीच भरती होईल, असे सांगीतले.

आम्हाला सत्तेत दोनच महिने झाले आहेत, त्यामुळे थोडा धीर धरावा. दोन महिन्यांपूर्वी आम्ही ‘मोठा कार्यक्रम’ केल्यानंतर महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. संतपीठ, वसतिगृह विस्तारीकरण, अध्यासन केंद्र, सामाजिक शास्त्र संकुलासह विद्यापीठाने ज्या मागण्या केल्या आहेत, त्यांना निधी देण्याचा विचार केला जाईल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

मुख्यमंत्र्यांच्या विविध घोषणा  –

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी औरंगाबादमधील वेरूळ मंदिरासाठी 136 कोटी रुपये, पैठणमध्ये संत उद्यान, पाणीपुरवठा योजना, शिर्डी महामार्ग, क्रीडा संकुल बनवणार, जायकवाडी कालवा दुरुस्ती करणार, मराठवाड्यात पाणी वळवण्यासाठी प्रकल्प, जालना पाणीपुरवठा नूतनीकरण, नांदेड जिल्हा क्रीडा संकुलासाठी निधी देणार, लातूरमध्ये कृषी महाविद्यालय तरतूद, मराठवाडा वाटर ग्रीडमधून लातूरसाठी मान्यता, या घोषणा केल्या.