घरमहाराष्ट्रकमी बोलतो , जास्त काम करतो; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंना...

कमी बोलतो , जास्त काम करतो; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंना टोला

Subscribe

मी मुख्यमंत्री असलो तरी जनतेचा सेवक,शिवसैनिकांवर अन्याय होऊ देणार नाही

मी आठवड्यातील सातही दिवस २४ तास काम करणारा मुख्यमंत्री आहे. मुख्यमंत्री असलो तरी सर्वांत आधी जनतेचा सेवक आहे. याच भावनेने आपल्याला काम करायचे आहे. मी कमी बोलतो आणि जास्त ऐकतो, असे म्हणत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाव न घेता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना टोला लगावला. आपल्याला सरकारची प्रतिमा बदलायची आहे. मी राज्यातील जनतेच्या सेवेसाठी सामान्य कार्यकर्ता म्हणून काम करणार आहे. मी मुख्यमंत्रीपदी असताना कुठल्याही शिवसैनिकावर अन्याय होऊ देणार नाही. सर्वांसाठी मंत्रालयाचे दरवाजे २४ तास खुले असतील. आमदारांनी माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. गरज पडल्यास टोकाचे पाऊल उचलेन, असा इशाराही एकनाथ शिंदे यांनी दिला. शिवसेनेच्या बंडखोर गटाचा रविवारी पंढरपुरात पहिला मेळावा झाला. या मेळाव्याच्या निमित्ताने शिंदेंनी जोरदार शक्तिप्रदर्शन करीत शिवसैनिकांना संबोधित केले.

या मेळाव्यात तानाजी सावंत यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, बाळासाहेबांचे हिंदुत्व इतर समाजाचा द्वेष नाही, तर स्वधर्मासह प्रत्येक समाजाचा आदर राखणे आहे. हा मेळावा एकनाथ शिंदे गटाचा नाही, तर बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा आहे. आमच्यावर खालच्या पातळीवर टीका केली तरी आम्ही टीकेवर बोललो नाही. महाराष्ट्राला सुजलाम्-सुफलाम् करून उत्तर देऊ.

- Advertisement -

शिंदे यांनी महाराष्ट्राच्या विकासाचा आराखडा सर्वांसमोर ठेवला. महाराष्ट्राचा विकास दर देशात सर्वाधिक आहे. आपल्याकडे गुणवत्ता आहे. मराठी माणूस जगाच्या कानाकोपर्‍यात पोहचला आहे. गतिमान सरकार आणि गतिमान प्रशासन ही रथाची दोन चाके आहेत. ही चाके एकाच वेगाने धावली तर राज्याचा विकास होऊ शकतो. राज्यातील जनतेच्या आपल्याकडून असलेल्या अपेक्षा वाढल्या आहेत. आपण सरकारचे निर्णय आणि योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहचवली पाहिजे. जेणेकरून सरकारची प्रतिमा बदलेल, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

उठावाची ३३ देशांकडून दखल
मी सत्ता सोडून एका वैचारिक भूमिकेतून विरोधकांत सहभागी झालो हे जगातील वेगळे उदाहरण आहे. ५० आमदारांनी विश्वास दाखवणे ही साधी गोष्ट नाही. ही एक ऐतिहासिक घटना आहे. आमच्या उठावाची ३३ देशांनी दखल घेऊन कौतुक केले, असे शिंदे म्हणाले.

- Advertisement -

पंढरपूरच्या विकासासाठी विशेष आराखडा
पंढरपुरात वारकर्‍यांसाठी चांगले आणि आरोग्यदायी वातावरण असले पाहिजे. त्यासाठी आवश्यक सोयीसुविधा सरकारकडून उपलब्ध करून दिल्या जातील. त्यासाठी तिरूपतीच्या धर्तीवर पंढपूर देवस्थानासाठी मी विशेष विकास आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. भविष्यात पंढरपूर सर्व सोयीसुविधांयुक्त असेल, असे आश्वासन एकनाथ शिंदे यांनी दिले.

याचिका निकाली काढावी
आजच्या आमदार अपात्रतेच्या याचिकेवरील सुनावणी सर्वोच्च न्यायालयाच्या कामकाजात समाविष्ट नसल्याने सुनावणी होणार की नाही यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यावर ही याचिका निकाली काढावी, अशी विनंती विधिमंडळ सचिवांनी न्यायालयाला केली आहे. सोबतच शिवसेना आमदार अपात्रतेची प्रक्रिया नवीन अध्यक्षांकडे वर्ग करण्यात यावी. नवीन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे १६४ मतांनी नेमले आहेत. हे प्रकरण अध्यक्षांसमोर असून कार्यवाहीचे अधिकार अध्यक्षांनाच आहेत, असे शपथपत्र विधिमंडळ सचिव राजेंद्र भागवत यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -