मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महिनाअखेरीस नाशकात ?

नाशिक : येथे आयोजित अखिल भारतीय महानुभाव संमेलनासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बुधवारी (दि. ३१) नाशिक दौर्‍यावर येणार आहेत. याकरीता आयोजकांकडून नियोजन सुरू असून मुख्यमंत्र्यांच्या दौर्‍याच्या पार्श्वभूमीवर तयारीलाही वेग आला आहे.

भगवान श्री चक्रधर स्वामी अष्टशताब्दी जन्मोत्सव व अखिल भारतीय महानुभाव संमेलनाचे नाशिक येथे दि. २९ ते दि. ३१ रोजी आयोजन करण्यात आले आहे. डोंगरे वसतिगृह मैदान येथे आयोजित या संमेलनात देशभरातून एक लाख संत-महंत व भाविक उपस्थित राहणार असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले. या संमेलनाच्या पहिल्या दिवशी दि. २९ रोजी ध्वजारोहण, धर्मसभा, जन्मोत्सव व पुष्पवृष्टी अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तर मंगळवारी (दि. ३०) शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. दि. ३१ रोजी प्रमुख धर्मसभेचे आयोजन करण्यात आले आहे. या धर्मसभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. अद्याप अधिवेशन सुरू असल्याने मुख्यमंत्र्यांचा अधिकृत दौरा प्राप्त झाला नसला तरी, आयोजकांकडून तयारी सुरू करण्यात आली आहे. या संमेलनाला आचार्य सुकेणकरबाबा शास्त्री, आचार्य चिरडे बाबा, महंत कृष्णराज बाबा मराठे यांची प्रमुख उपस्थिती राहणार असल्याचे आयोजक दिनकर पाटील, बाळासाहेब सानप, दत्ता गायकवाड, प्रकाश घुगे, प्रकाश ननावरे यांनी कळवले आहे.