घरमहाराष्ट्रEknath Shinde : सगेसोयरेंच्या अधिसूचनेवर मुख्यमंत्री म्हणतात, आम्ही कुणालाही फसवणार नाही

Eknath Shinde : सगेसोयरेंच्या अधिसूचनेवर मुख्यमंत्री म्हणतात, आम्ही कुणालाही फसवणार नाही

Subscribe

मुंबई : मराठा समाजाल सरकारकडून 10 टक्के आरक्षण देण्यात आलं आहे, पण मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आरोप केला की, 10 टक्के आरक्षण आमच्यावर लादण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामुळे आम्हाला ओबीसी कोट्यातूनच आरक्षण द्या आणि सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी घेतल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे. एवढेच नाहीतर मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री फडणवीसांवरही गंभीर आरोप केले. या सर्व प्रकरणी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी र्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला घेतलेल्या पत्रकार परिषदेत भाष्य केले आहे. (Chief Minister Eknath Shinde says on Sagesoyrens notification we will not deceive anyone)

हेही वाचा – Eknath Shinde : मनोज जरांगेंना अटक करण्याच्या प्रश्नावर मुख्यमंत्री म्हणाले, “संयमाचा अंत पाहू नका”

- Advertisement -

एकनाथ शिंदे म्हणाले की, सरकारने घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयांमध्ये मराठा आरक्षणाचाही समावेश केला. आज काही लोक म्हणतात की, मराठा आरक्षण टिकणार नाही. पण का टिकणार नाही? असा प्रश्न करत त्याची कारणं तरी द्या. मराठा समाजाला दिलेलं आरक्षण कायद्याच्या कसोटीवर टिकणारं आहे. आरक्षण कसं टिकलं पाहिजे, याच्या सूचना न करता टिकणार नाही, असं विरोधक म्हणत आहेत, पण त्याची कारणंही देत नाही आहेत, असा टोला एकनाथ शिंदे यांनी लगावला.

यावेळी अधिसूचनेवर आलेल्या हरकतींचा मुद्दा उपस्थित करत मुख्यमंत्र्यांनी आपली बाजू मांडताना म्हटले की, यात कायदेशीर बाबी पूर्ण करायला हव्यात. घाईगडबडीत कोणताही निर्णय घेता येणार नाही. पण आम्ही कुणालाही फसवणार नाही. त्यामुळे आम्ही टिकणारा निर्णय घेतला आहे. माझं विरोधी पक्षांना आवाहन आहे की, आरक्षण दिल्यानंतर त्यांनी सहकार्याची भूमिका घ्यायला हवी होती. पण टिकणार नाही असं म्हणून मराठा समाजाचं खच्चीकरण करण्याचं काम कोण करतं आहे? असा सवाल करत याचा उलगडा जनतेसमोर लवकरच होईल, असा इशारा एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना दिला.

- Advertisement -

हेही वाचा – NCP-SP : फडणवीसांची ताबडतोब चौकशी करावी; जरांगेंच्या आरोपानंतर शरद पवार गटाची मागणी

मनोज जरांगे यांचे नाव न घेता एकनाथ शिंदे म्हणाले की, कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारीही आमची आहे. त्यामुळे संयम पाळावा, कुणीही कायदा हातात घेऊ नये. आंदोलनकर्त्यांनी सरकारने केलेल्या गोष्टींची जाणीव ठेवली पाहिजे. सरकार कुठे कमी पडतं आहे, हे दाखवावे. काही लोकांचं अराजकता पसरवण्याचं कारस्थान सुरू आहे. मात्र कुणीही संभ्रम निर्माण करण्याचा किंवा सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करू नये. जनता सूज्ञ आहे, असेही एकनाथ शिंदे म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -