घरमहाराष्ट्रनाशिकमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मिरगावी भविष्य जाणल्याची चर्चा अन् अंनिसची नाराजी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मिरगावी भविष्य जाणल्याची चर्चा अन् अंनिसची नाराजी

Subscribe

अहमदनगर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सपत्नीक शिर्डीच्या साईबाबांचे दर्शन घेतले. त्यांनी यासाठी आपले सर्व कार्यक्रम रद्द केल्याचे सांगण्यात येते. तसेच साईदर्शनानंतर ते सिन्नरच्या मिरगावात गेले आणि तिथे एका ज्योतिषाकडून आपले भविष्य जाणून घेतल्याची चर्चा आहे. यावर अंधश्रद्धा निर्मूलन समितीने मात्र तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

मुख्यमंत्री शिंदे यांनी आज आपले दिवसभरातील नियोजित कार्यक्रम रद्द करून ते हेलिकॉप्टरने शिर्डीत दाखल झाले. तिथे त्यांनी सपत्नीक साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासोबत महसूल, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकासमंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे‌-पाटील, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर उपस्थित होते. त्यानंतर ते मुंबईला परततील असा सर्वांचा होरा होता. मात्र त्यांच्या वाहनांचा ताफा सिन्नरच्या दिशेला रवाना झाला.

- Advertisement -

सिन्नर शिर्डी रोडवरील मिरगाव येथे ईशान्येश्वर मंदिरात जाऊन त्यांनी दर्शन घेतले. यावेळी देखील त्यांच्यासमवेत महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील तसेच शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, शिवनिका संस्थानचे अध्यक्ष कॅप्टन अशोककुमार खरात, उपाध्यक्ष राजेंद्र घुमरे, सरचिटणीस नामकर्ण आवारे, विश्वस्त नितीन गांगुर्डे, डॉ निरंजन निर्मळ, अरविंद बावके, रमेश हिंगे, दीपक लोंढे आदी देखील होते. नंतर त्यांनी एका ज्योतिषाची भेट घेतली आणि आपले भविष्य जाणून घेतल्याचे सांगितले जाते.

मात्र, या प्रकाराबद्दल अंधश्रद्धा निर्मूलन समितीने तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री शिर्डी दौऱ्यावर आले असताना मिरगाव (सिन्नर) येथील एका ज्योतिषाकडे भविष्य पाहण्यासाठी गेल्याचे समजते आहे. ते खरे असल्यास ही अत्यंत बेजबाबदार कृती आहे. पुरोगामी महाराष्ट्रात संवैधानिक पदावर असलेल्या मुख्यमंत्र्यांच्या या कृतीचा जाहीर निषेध महाराष्ट्र अंनिस करत आहे. ज्योतिष हे शास्त्र नसून थोतांड आहे. कुणी ते शास्त्र असल्याचे सिद्ध केल्यास आम्ही एकवीस लाखांचे बक्षीस ठेवले आहे. मुख्यमंत्र्यांच्या या वर्तनातून चुकीचा संदेश गेला आहे, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र अंनिसचे राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -