द्रौपदी मुर्मू यांना समर्थन देणे योग्यच, मुख्यमंत्री शिंदे यांचे ठाम मत

शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांची भाजपच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना समर्थन देण्याची भूमिका योग्य आहे, असे ठाम मत मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केले.

uddhav thackeray and shiv sena

शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांची भाजपच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना समर्थन देण्याची भूमिका योग्य आहे. यावेळी राष्ट्रपती पदावर एक आदिवासी महिला विराजमान होत असेल तर ती अभिमानाची बाब आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे मोठे पाऊल उचलले आहे. त्याला पाठिंबा देणे हे योग्य आहे, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

खासदार भावना गवळींच्या हकालपट्टीवर शिंदेंचा पक्षप्रमुखांना सवाल –

लोकसभेच्या शिवसेनेच्या प्रतोदपदावरुन खासदार भावना गवळी यांची हकालपट्टी करण्यात आल्यानंतर अजून किती जणांची पक्षातून हकालपट्टी करणार, असा सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना केला. आम्ही यापूर्वी शिवसेनेत होतो, आजही शिवसेनेत असून, आम्ही शिवसैनिक असल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले. कायदा आणि नियमाने आम्हाला आमचे पद दिले असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

कायदा आणि सुव्यवस्था कोणीही हातात घेऊ नये –

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाता जाता औरंगाबाद शहराचे नामकरण संभाजीनगर केल्याचे जाहीर केले. त्यानंतर एमआयएमने या नावाला विरोध केला आहे, याकडे शिंदे यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले की, कायदा आणि सुव्यवस्था कोणीही हातात घेऊ नये. मग ती व्यक्ती खासदार असो की आमदार. सरकार अशा व्यक्तीवर कारवाई करील. शांततेच्या मार्गाने हे प्रश्न सोडविता येऊ शकतात, असे ते म्हणाले.