मुख्यमंत्री शिंदेच्या विधान परिषदेतील खेळीने ठाकरेंच्या गडाला खिंडार, नेमला नवा प्रतोद

Eknath-Shinde

मुंबई : गेले आठ महिने राज्यात सत्तासंघर्ष (Maharashtra political crisis) सुरू आहे. हा संघर्ष सर्वोच्च न्यायालयाच्या दारात पोहोचला आहे. मागील आठवड्यानंतर त्यावर आज, मंगळवारी सुनावणी आहे. एकीकडे अशी न्यायालयीन लढाई सुरू असतानाच विधिमंडळात शह-काटशहचे राजकारणही सुरू आहे. त्यातच विधान परिषदेतील खेळीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी ठाकरे गटाच्या अबाधित गडाला सुरूंग लावला आहे. ठाकरे गटाने प्रतोद म्हणून विलास पोतनीस यांचे नाव निश्चित केलेले असतानाच, शिंदे यांच्या शिवसेनेकडून विप्लव गोपीकिशन बाजोरिया यांचे नाव उपसभापतींना पाठविण्यात आले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गेल्या वर्षी जूनमध्ये ‘उठाव’ करून महाविकास आघाडी सरकार खाली खेचले आणि भाजपाच्या मदतीने सरकार स्थापन केले. त्यासंदर्भात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. शिंदे गटाने देखील त्यांच्याविरोधात याचिका दाखल केली. तर दुसरीकडे, शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्हावर शिंदे गटाने दावा केला. शिंदे गटाकडे शिवसेनेच्या विधानसभेतील 55 आमदारांपैकी 40 आमदार आणि लोकसभेतील 19 खासदारांपैकी 13 खासदार आहेत. इतर कारणांबरोबरच या आकडेवारीचा आधार घेत केंद्रीय निवडणूक आयोगाने शिंदे गटाला शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह बहाल केले.

या सर्व संघर्षात विधान परिषद आणि राज्यसभेतील सदस्यांनी अद्याप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत असल्याचा दावा केलेला नाही. त्यामुळे विधान परिषदेतील 12 सदस्य तर राज्यसभेतील तीन सदस्य हे उद्धव ठाकरे यांचेच पाठिराखे आहेत, असे मानले जाते. शिवाय, मुख्यमंत्री शिवसेनेचा आणि विरोधी पक्षनेता देखील शिवसेनेचाच असे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर विधान परिषदेतील प्रतोदपदासाठी ठाकरे गटाकडून विलास पोतनीस यांचे नाव उपसभापती नीलम गोऱ्हे यांना पाठवण्यात आले आहे. विरोधी पक्षाच्या बैठकीमध्ये विलास पोतनीस यांच्या नावाचा ठराव झाल्याचे सांगण्यात येते.

तर दुसरीकडे, शिंदे गटाने विधान परिषदेतील प्रतोदपदासाठी विप्लव गोपीकिशन बाजोरिया यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. शिवसेना विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून या बैठकीतील निर्णय उपसभापतींना पत्राद्वारे कळवण्यात आला आहे. सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात आज, मंगळवारी सुनावणी होत असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अशा रीतीने एक वेगळी चाळ खेळत ठाकरे गटाच्या विधान परिषदेतील गडाला खिंडार पाडले आहे.