घरमहाराष्ट्रप्रभाग पुनर्रचनेलाही स्थगिती? मुख्यमंत्री शिंदे यांचे संकेत

प्रभाग पुनर्रचनेलाही स्थगिती? मुख्यमंत्री शिंदे यांचे संकेत

Subscribe

मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या तोंडावर करण्यात आलेली प्रभाग पुनर्रचना आणि आरक्षण रद्द करून पारदर्शक पद्धतीने नवीन प्रभाग रचना करावी, अशी मागणी काँग्रेसचे माजी खासदार मिलिंद देवरा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून केली आहे. त्यावर प्रसारमाध्यमांनी विचारणा केल्यावर देवरा यांचे पत्र मिळाले असून राज्यातील अनेक ठिकाणांहून प्रभाग पुनर्रचनेच्या असंख्य तक्रारीही आपल्याला मिळाल्या आहेत. त्यावर चर्चा करून निर्णय घेऊ, असे उत्तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी दिले. यावरून ठाकरे सरकारने केलेल्या प्रभाग पुनर्रचनेलाही स्थगिती मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभागांची संख्या २२७वरून २३६ करण्यात आली व प्रभागांची पुनर्रचना करण्यात आली. नुकतीच या २३६ प्रभागांसाठी आरक्षण सोडतही काढण्यात आली. फेब्रुवारी २०२२मध्ये झालेल्या प्रभाग रचनेविरोधात अनेक राजकीय आणि अराजकीय लोकांनी ८०० तक्रारी केल्या होत्या, मात्र त्याची दखल न घेता ही प्रभाग रचना मंजूर केली. काँग्रेसने जिंकलेल्या ३० जागांपैकी २० जागांची पुनर्रचना जाणीवपूर्वक चुकीच्या पद्धतीने करण्यात आली. सत्ताधारी पक्षाला लाभ होईल अशा पद्धतीने प्रभाग पुनर्रचना व आरक्षण सोडत काढण्यात आल्यामुळे काँग्रेसचे नुकसान झाल्याचा आरोप मिलिंद देवरा यांनी पत्रातून केला आहे. या निर्णयाविरोधात काँग्रेसचे नगरसेवक आणि आमदार न्यायालयातही गेले आहेत.

- Advertisement -

या पत्राला देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवरून उत्तरही दिले आहे. आम्हाला तुमचे पत्र मिळाले. आपल्या मागणीकडे आमचे लक्ष आहे. आम्ही नक्कीच मुंबईकर आणि आपली चिंता दूर करण्यासाठी निपक्षपातीपणे निवडणुका घेण्यासाठी प्रयत्न करू.
-देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -