मुख्यमंत्री शिवसेनेचाच!

Nawab Malik

मुख्यमंत्री शिवसेेनेचाच होईल, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सांगितले आहे. नवाब मलिकच राष्ट्रवादी काँग्रेसची अधिकृत भूमिका जाहीर करतील, त्यामुळे त्यांनाच विचारा असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी स्पष्ट केले होते. त्यामुळे मुख्यमंत्रीपदाबाबत मलिक यांच्या या वक्तव्याला महत्त्व प्राप्त झाले आहे.

कोणाला किती आणि कोणती मंत्रिपदे मिळणार, तसेच किमान समान कार्यक्रम काय यावर वाटाघाटी सुरू आहेत. अशा परिस्थितीत राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते नवाब मलिक यांनी मुख्यमंत्रीपदावर मोठे भाष्य केले आहे. मुख्यमंत्रीपद शिवसेनेकडे असेल, असे नवाब मलिक यांनी सांगितले.

शिवसेना महाआघाडीत मुख्यमंत्रीपद कोणाकडे असेल, असे नवाब मलिक यांना विचारण्यात आले, त्यावर नवाब मलिक म्हणाले, मुख्यमंत्रीपदाच्या मुद्यावरच शिवसेना वेगळी झाली आहे. त्यामुळे त्यांचा सन्मान राखणे आणि त्यांचा स्वाभिमान जिवंत ठेवणे ही आमची जबाबदारी आहे. मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल. उपमुख्यमंत्रीपदाबाबत अद्याप चर्चा झालेली नाही. काँग्रेसला सत्तेत यायचेच नाही, तर मागण्या कुठून समोर यायला लागल्या? मला नाही वाटत. त्यांना तर बाहेरुन पाठिंबा द्यायचा आहे, आमची इच्छा आहे की त्यांनी सत्तेत यावे.

पद, खाती याबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही. येत्या दिवसात कोणताही वाद होणार नाही. आम्ही सगळे एकत्र बसून चर्चा करू. पर्यायी सरकार निर्माण करणे ही आमची जबाबदारी आहे.

तीन पक्ष एकत्र आल्याशिवाय महाराष्ट्रात सरकार स्थापन होऊ शकणार नाही. शरद पवार मुंबईत आहेत, ते दिल्लीला जाणार नाहीत. काँग्रेसचा निर्णय आल्यानंतर आम्ही आमचा निर्णय जाहीर करू, असे नवाब मलिक तीन दिवसांपूर्वी म्हणाले होते.