Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र मुख्यमंत्री साहेब आपण वेळात वेळ काढून... रोहित पवार यांची बोचरी टीका

मुख्यमंत्री साहेब आपण वेळात वेळ काढून… रोहित पवार यांची बोचरी टीका

Subscribe

मुंबई : यंदा पावसाने ओढ दिल्याने राज्यात अनेक ठिकाणी दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच मराठा आरक्षणावरूनही वातावरण तापले आहे. मात्र, राज्य सरकार या प्रश्नांबाबत फारसे गंभीर नसल्याची टीका विरोधकांनी केली आहे. याच अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर बोचरी टीका केली आहे.

- Advertisement -

यंदाचा पावसाळा हा कोरडा जाताना दिसत आहे. काही भागांत महिनाभराच्या विश्रांतीनंतर पावसाने पुन्हा एन्ट्री केली असली तरी मराठवाडा, नगर जिल्ह्यासह राज्याच्या अनेक भागांत ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात पाऊस न झाल्याने पेरण्या वाया गेल्या आहेत. दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले, पण दुबार पेरणीने तरी शेतकऱ्यांना दिलासा मिळेल काय? अनेक तालुक्यांत पिण्याच्या पाण्याचा, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. पण राज्यकर्ते त्यांच्या राजकारणात मश्गूल आहेत, अशी टीका ठाकरे गटाने केली आहे.

हेही वाचा – राजकारणासाठी पैसा आहे, पण शेतकऱ्यांसाठी नाही…, ठाकरे गटाची राज्य सरकारवर टीका

- Advertisement -

दुसरीकडे, मराठा आरक्षणाचा मुद्दाही तापला आहे. मराठा आरक्षणासाठी जालन्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा मोर्चा समन्वयक मनोज जरांगे हे आपल्या सहकाऱ्यांसह बेमुदत उपोषणाला बसले आहेत. अलीकडेच पोलिसांकडून या आंदोलकांवर अमानुषपणे लाठीमार करण्यात आला. त्याबद्दल राज्यभरात संताप व्यक्त करण्यात येत आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाठीमाराच्या या घटनेबद्दल सरकारच्यावतीने माफी मागितली आहे.

हेही वाचा – निमंत्रण द्यायला ‘ती’ काही सत्यनारायणाची पूजा नव्हती; वडेट्टीवारांचा आंबेडकरांना टोला

या सर्व पार्श्वभूमीवर मुंबई-ठाण्यासह राज्यभरात काल, गुरुवारी दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला. आगामी निवडणुकीच्या दृष्टीने सर्वच राजकीय पक्षांनी यानिमित्ताने शक्तीप्रदर्शन केले. याच अनुषंगाने आमदार रोहित पवार यांनी ट्वीट केले आहे. आपल्या अतिशय व्यग्र वेळापत्रकातून वेळात वेळ काढत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जवळपास 31 दहीहंड्यांना भेट देऊन गोविंदांचा उत्साह वाढवला. पण राज्यात दुष्काळाने शेतकरी होरपळला असून यंदाचा कोरडवाहू खरीप हंगाम जवळपास पूर्णता वाया गेला आहे. कदाचित आज-उद्या पाऊस पडेलही, परंतु झालेले नुकसान भरून निघणार नाही. त्यामुळे शेतकरी प्रचंड हवालदिल आहे. दुसरीकडे मराठा व धनगर आरक्षणसंदर्भात राज्यात वेगवेगळ्या भागांत आंदोलने सुरू आहेत. अशा सर्व स्थितीत मुख्यमंत्री साहेब आपण वेळात वेळ काढून दुष्काळग्रस्त शेतकऱ्याच्या बांधावर येऊन शेतकऱ्यांना तसेच आंदोलनस्थळी येऊन आंदोलकांना देखील धीर द्याल, ही माफक अपेक्षा असल्याची बोचरी टीका त्यांनी केली आहे.

- Advertisment -