घरताज्या घडामोडीदेशमुख यांच्या निधनावर मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला शोक

देशमुख यांच्या निधनावर मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला शोक

Subscribe

गणपतराव देशमुख यांचं निधन, शरद पवार, जंयत पाटील यांच्यासह राष्ट्रवादी नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली

माजी आमदार गणपतराव देशमुख यांनी वयाच्या ९४ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. गणपतराव देशमुख यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान गणपतराव देशमुख यांची प्राणज्योत मालवली असून राजकारणातील मोठं नेतृत्व गमावलं आहे. गणपतराव देशमुखांच्या जण्याने राजकीय मंडळी शोक व्यक्त करत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी साध्या, सात्विक विचारसरणीचा मापदंड राजकारणात निर्माण करणारे व्यक्तिमत्व हरपले असे म्हणत शोक व्यक्त केला आहे. तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे आबासाहेबांची प्रकृती आत्तापर्यंत चांगली होती. पण आज रात्री 9 वाजता आबासाहेबांचं निधन झालं असल्याची माहिती गणपतराव देशमुख यांच्या नातवानं दिली आहे.

मुख्यमंत्र्यांनी केला शोक व्यक्त

राजकारणातील एक साधे आणि सात्विक व्यक्तिमत्व हरपले अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगोलाचे माजी आमदार आणि ज्येष्ठ शेकाप नेते गणपतराव देशमुख यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. सर्वाधिक काळ आणि सातत्याने त्यांनी त्यांच्या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व राज्य विधिमंडळात केले हे तर त्यांच्या राजकीय कारकिर्दीचे वैशिष्ट्य होतेच, पण त्यापेक्षाही ज्या साध्या आणि उच्च विचारसरणीने त्यांनी त्यांचे जीवन व्यतीत केले ते मला महत्वाचे वाटते असे सांगून मुख्यमंत्री म्हणतात की, आबासाहेबांनी राजकारणामध्ये एक आदर्श निर्माण केला, जो की वर्षानुवर्षे एक मापदंड म्हणून राजकीय विश्वात राहील.

- Advertisement -

शरद पवार यांच्याकडून शोक व्यक्त

राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी देखील श्रद्धांजली वाहिली आहे. “कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर व उपेक्षितांच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठविणारे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांच्या निधनाचे वृत्त दुःखद आणि क्लेशदायक आहे. महाराष्ट्राच्या चार पिढ्यांच्या मतदारांशी घट्ट नाळ जुळलेला गणपतरावांसारखा लोकप्रतिनिधी खरंच विरळा म्हणावा लागेल. लोकाभिमुख राजकारणाची कास धरत सोलापूर जिल्ह्यातील सांगोला मतदारसंघातून ११ वेळा निवडून येण्याची किमया गणपतरावांनी साधली. त्यांच्या निधनामुळे जनसामान्यांचे आणि कार्यकर्त्यांचे निस्सीम प्रेम लाभलेला स्वच्छ प्रतिमेचा, ध्येयवादी नेता आज आपण गमावला आहे. भावपूर्ण श्रद्धांजली!” अशा शब्दात शरद पवार यांनी शोक व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली आहे.

गणपतराव देशमुख यांचे नातू डॉ. अनिकेत देशमुख यांनी गणपतराव देशमुख यांच्या निधनाबाबत माहिती दिली आहे. ‘आबासाहेब देशमुख यांच्या जाण्याने आमच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. राजकारणामध्ये ज्यांनी त्यांच्यासोबत काम केलं त्यांच्या सगळ्यांसाठीच हा मोठा धक्का आहे. तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे आबासाहेबांची प्रकृती आत्तापर्यंत चांगली होती. पण आज रात्री ९ वाजता आबासाहेबांचं निधन झालं अशी माहिती गणपतराव देशमुख यांचे नातू डॉ. अनिकेत देशमुख यांनी दिली आहे.

- Advertisement -

उपमुख्यमंत्र्यांनी वाहिली श्रद्धांजली

ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांनी अर्ध्या शतकाहून अधिकच्या प्रदीर्घ संसदीय कारकिर्दीत ध्येयनिष्ठा, पक्षनिष्ठा कायम जपली. महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक चळवळीला सुसंस्कृत चेहरा दिला. राजकारणाला नैतिक अधिष्ठान दिलं.महाराष्ट्राचा पुरोगामी विचार पुढे नेण्याचं काम त्यांनी केलं. त्यांच्या अभ्यासपूर्ण भाषणांनी महाराष्ट्र विधीमंडळाचा गौरव वाढवला. राजकीय, सामाजिक कार्यकर्त्यांचा मार्गदर्शक दीपस्तंभ ढासळला आहे. महाराष्ट्रानं सद्गुणी सुपुत्र गमावला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातलं अजातशत्रू व्यक्तिमत्व म्हणून गणपतराव आबा कायम स्मरणात राहतील अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचे स्मरण करुन भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे. अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

राज्यपाल भगसिंह कोश्यारींकडून शोक व्यक्त

“राज्य विधानसभेचे सर्वाधिक काळ सदस्य राहिलेले शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते श्री गणपतराव देशमुख यांच्या निधनाचे वृत्त समजून अतिशय दुःख झाले. आदर्श लोकप्रतिनिधी असलेल्या देशमुख यांनी शेतकरी, कष्टकरी व जनसामान्यांप्रती आपली बांधिलकी शेवटपर्यंत जपली. साधी राहणी व उच्च विचारसरणीचे ते मूर्तिमंत उदाहरण होते. शांत, संयमी तरीही लढवय्ये असलेले गणपतराव देशमुख अजातशत्रू होते. त्यांच्या निधनाने राज्य विधानमंडळाने एक चालते बोलते विद्यापीठ गमावले आहे, असे राज्यपालांनी आपल्या शोक संदेशामध्ये म्हटले आहे.

जयंत पाटील यांनी वाहिली श्रद्धांजली

राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनीही श्रद्धांजली वाहिली आहे. “गणपतराव उर्फ आबासाहेब देशमुख यांचे दुःखद निधन झाल्याची बातमी अत्यंत वेदनादायक आहे. तब्बल ५० वर्षांहून अधिक काळ त्यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेत घालवला. एकाच विचारधारेचा झेंडा खांद्यावर घेऊन निष्ठेने सांभाळला.विधिमंडळात आबासाहेब बोलायला उभे राहिले कि सगळे सभागृह शांत होऊन ऐकायचे. आबासाहेब देशमुख यांच्या निधनामुळे महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनाची मोठी हानी झाली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातील भीष्म पितामह आज हरपला. गणपतराव उर्फ आबासाहेब देशमुख यांना महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली” असे ट्विट जयंत पाटील यांनी केलं आहे.

नवाब मलिक यांनी वाहिली श्रद्धांजली

शेकापचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार गणपतराव देशमुख जी यांचे आज निधन झाले. ही बातमी अत्यंत दुःखदायक आहे. अभ्यासू नेता, अत्यंत साधी राहणी व उच्च विचारसरणी अशी त्यांची ओळख होती. आम्ही सर्वजण देशमुख कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत. भावपूर्ण श्रद्धांजली!

एकनाथ खडसेंनी वाहिली श्रद्धांजली

महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि जेष्ठ नेते गणपतराव देशमुख यांच्या निधनामुळे महाराष्ट्रातील एक जेष्ठ नेत्रूत्व हरपले आहे. शेत मजूर, कष्टकरी या वर्गासाठी त्यांनी केलेले काम हे ऐतिहासिक आणि अनुकरणीय असे आहे. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली! असे एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे.

सुप्रिया सुळेंनी वाहिली श्रद्धांजली

शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते,माजी आमदार भाई गणपतराव देशमुख (आबा) यांचे निधन झाले.महाराष्ट्र विधानसभेवर सर्वाधिक काळ निवडून गेलेले कर्तव्यदक्ष आमदार असा त्यांचा लौकीक होता.सत्यशोधकी विचारांवर त्यांनी आयुष्यभर वाटचाल केली.त्यांचे संपूर्ण आयुष्य कृतीशील विचारांचा वस्तुपाठ आहे. त्यांनी महाराष्ट्र सरकारमध्ये विविध खात्याचे मंत्री म्हणूनही काम पाहिले.त्यांच्या कार्यकाळात त्यांनी अतिशय महत्वाचे व महाराष्ट्राच्या विकासावर सकारात्मक परिणाम करणारे निर्णय घेतले. त्यांच्या निधनामुळे राज्याच्या राजकारणातील एक ऋषीतुल्य व्यक्तीमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले अशा शब्दात खासदार सुप्रिया सुळे यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

विधानसभेत ५० वर्ष सहभाग

गणपतराव देशमुख यांची राजकीय कारकिर्दीला सुरूवात केल्यापासूनच ते शेतकरी कामगार पक्षातच होते. शरद पवार यांनी जेव्हा पुलोद सरकारचा प्रयोग केला त्यावेळी मंत्रिमंडळात त्यांचा समावेश झाला होता. ११९९ लाही गणपतराव देशमुख यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला होता. २०१२ मध्ये विधानसभेतल्या त्यांच्या सहभागास ५० वर्षे पूर्ण झाल्याने सभागृहासह सरकारने त्यांचा गौरव केला होता.

सर्वाधिक वेळा आमदार

विधानसभेवर एकाच मतदारसंघातून सर्वाधिक वेळा निवडून येण्याचा द्रविड मुन्नेत्र कळघमचे नेते एम.करुणानिधी यांचा विक्रम शेतकरी कामगार पक्षाचे आमदार गणपतराव देशमुख यांनी मोडला होता.महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सोलापूर जिल्ह्यातील सांगोला मतदारसंघातून ११ वेळा त्यांनी विक्रमी विजय मिळवला होता. २००९ च्या निवडणुकीत विजय मिळवून एम.करुणानिधी यांच्या पाठोपाठ दहाव्यांदा आमदारकीची निवडणूक जिंकणारे देशमुख हे देशातील दुसरे आमदार ठरले होते.अत्यंत साधी राहणी असलेल्या गणपतरावांनी तब्बल 54 वर्षे सांगोल्याचे प्रतिनिधित्व केले होते.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -