उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा, ३१ महिन्यांत आघाडी सरकार कोसळले

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज रात्री उशिरा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ठाकरे सरकारला बहुमत चाचणी घेण्याचे आदेश दिले होते. त्याला शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते.

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज रात्री उशिरा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ठाकरे सरकारला बहुमत चाचणी घेण्याचे आदेश दिले होते. त्याला शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. पण न्यायालयाने त्याला स्थगिती देण्यास नकार दिला. हा महाविकास आघाडीला धक्का होता. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी हा मोठा निर्णय घेतला. त्यामुळे अवघ्या ३१ महिन्यांत आघाडी सरकार कोसळले.

राजीनामा दिल्यानंतर मुंख्यमंत्री उद्धव ठाकरे मातोश्रीहून स्वत: गाडी चालवत राजभवनात दाखल झाले. त्यावेळी त्यांच्यासोबत आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरेही होते. राजभवनात उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेऊन मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा सुपूर्द केला.

ज्‍यांना शिवसेनेने,शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मोठे केले त्‍यांनीच शिवसेनाप्रमुखांच्या मुलाला मुख्यमंत्रिपदावरून खाली खेचण्याचे काम केले आहे.याचे पुण्य त्‍यांच्या पदरात पडू देत.त्‍यांच्यावर मी विश्वास ठेवला हे माझे पाप आहे.मला पदावरून खाली खेचल्‍याचा आनंद त्‍यांच्यापासून मला हिरावून घ्‍यायचा नाही, असे सांगत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री आणि विधान परिषदेच्या सदस्यत्वाचा राजीनामा देण्याची घोषणा केली.

ठाकरे यांच्या राजीनाम्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या सत्तासंघर्षाला पूर्णविराम मिळाला असून ठाकरे सरकार सत्तेवरून पायउतार झाल्याने आज, गुरुवारी विधानसभेत बहुमत चाचणी होणार नाही. त्यामुळे नव्या सरकारचा मार्ग मोकळा झाला असून भाजप आणि शिवसेनेतील एकनाथ शिंदे यांचा बंडखोर गट एकत्र येऊन सरकार स्थापन करण्याच्या हालचालींना आता वेग आला आहे.

सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दिलेल्या विश्वासदर्शक ठरावाला हिरवा कंदील दाखवला. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी आज समाज माध्यमाद्वारे जनतेशी संवाद साधला. बहुमत चाचणीचा खेळ खेळायचा नाही असे स्पष्ट करून उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाच्या राजीनाम्याची घोषणा केली. ही घोषणा करताना ठाकरे यांनी बंडखोरांना आपल्या शैलीत सूनवताना राज्यपालांचे नाव न घेता त्यांना टोले लगावले..मी आता शिवसेना भवनात बसणार आहे.एका नवीन शिवसेनेची उभारणी परत नव्या जोमाने करणार असल्‍याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. राजीनाम्याची घोषणा करताना उद्धव ठाकरे हे भावनिक झाले होते.

शिवसेनाप्रमुखांनी कोण रिक्षावाला, टपरीवाला अगदी हातभटटीवाल्‍यालाही मोठे केले.आमदारकी,खासदारकी,मंत्रीपदे दिली.आतापर्यंत ज्‍यांना मोठे केले जे-जे दयायचे ते दिले तेच आज नाराज आहेत.मात्र ज्‍यांना काही मिळाले नाही ते मात्र मातोश्री येथे येउन मला साथ देत आहेत.जे नाराज झाले त्‍यांनी खरे तर सुरत,गुवाहाटीला न जाता इथे मातोश्रीवर येउन तरी बोलायला पाहिजे होते.तुम्‍हाला आम्‍ही कधीतरी आपले मानले होते मग मनातले सांगायची काय अडचण होती? असेही ते म्‍हणाले.

लोकशाहीचा पाळणा हलू दया, शिवसैनिकांनो रस्‍तयावर उतरू नका

आता गुवाहाटीला गेलेले सर्व जण परत येतील.नव्या सरकारची स्‍थापना होईल.लोकशाहीचा पाळणा हलणार आहे.तो निश्चितच हलू दे.एकाही शिवसैनिकाने त्‍यांना रोखण्यासाठी रस्‍तयावर उतरू नये.आज मुंबईत अभूतपूर्व बंदोबस्‍त ठेवण्यात आला आहे.केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या तुकडया उतरल्‍या आहेत.कदाचित सैन्याला देखील बोलावतील.ज्‍या शिवसैनिकांनी या आमदारांच्या विजयाचा गुलाल उधळला होता त्‍यांच्याच रक्‍ताने इथले रस्‍ते माखलेले पाहणे मला आवडणार नाही.त्‍यामुळे या सगळयांना आरामात मुंबईत येउ दया कोणीही त्‍यांना रोखू नये असे आवाहनही ठाकरे यांनी केले. उद्या होणारी फलोअर टेस्‍ट वगैरे प्रकारच मला आवडत नाही.केवळ डोकी मोजण्याचा हा प्रकार हे लोकशाहीचे दुर्देव आहे.मला त्‍यात रस नाही असेही ते म्‍हणाले.

राज्‍यपालांनी ती यादी मंजूर केली तर आदर द्विगुणित होईल

राज्‍यपालांनी आम्‍हाला तातडीने चोवीस तासाच्या आत फलोअर टेस्‍ट करण्याचे आदेश दिले.लोकशाहीचे त्‍यांनी पालन केले.आता अडीच वर्षांपासून जी १२ विधानपरिषद सदस्‍यांची यादी त्‍यांच्याकडे पडून आहे ती त्‍यांनी आता तरी मंजूर करावी. तसे त्‍यांनी केल्‍यास त्‍यांच्याबददल आम्‍हाला असलेला आदर द्विगुणित होईल असेही ठाकरे म्‍हणाले.

शरद पवार-सोनिया गांधींचे आभार

जे विरोधात होते ते माझ्यासोबत उभे राहिले.माझीच माणसे सोडून गेल्‍याचे दुःख व्यक्‍त करताना उद्धव ठाकरे यांनी शरद पवार आणि सोनिया गांधी यांचेही आभार मानले.सरकार चालविताना यांनी मला कायम साथ दिली.आज औरंगाबादचे संभाजीनगर आणि उस्‍मानाबादचे धाराशीव करतानाचा निर्णय घेताना काँग्रेस, राष्‍ट्रवादी काँग्रेसच्या मंत्रयांनी एका अक्षरानेही विरोध केला नाही.अशोक चव्हाण तर मला म्‍हणालेही की,तुमच्या पक्षातील काही आमदारांचा जर आम्‍हाला विरोध असेल तर आम्‍ही सरकारला हवे तर बाहेरून पाठिंबा देतो.पण तुम्‍ही सरकार चालवा.आज संभाजीनगरचा निर्णय घेताना मी,आदित्‍य,सुभाष देसाई,अनिल परब हेच मंत्री होते.पण जे पाहिजे होते ते नव्हते.हे सरकार आल्‍यापासून सगळे चांगले चालले होते.आम्‍ही महत्‍वाचे निर्णयही घेतले.पण चांगले चालल्‍याला नेहमीच नजर लागत असते या सरकारलाही ती लागली.ती कोणाची ते तुम्‍ही जाणता असेही ठाकरे म्‍हणाले.आमच्या काळात राज्‍यात एकही धार्मिक दंगल झाली नाही.देशात सीएए,एनआरसीवरून वाद पेटलेला असताना महाराष्‍ट्र मात्र शांत होता.त्‍यासाठी मुस्‍लिम बांधवांनाही श्रेय दिले पाहिजे, असेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

अडीच वर्षात दुसरे सरकार कोसळले

उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यामुळे गेल्या अडीच वर्षांत कोसळलेले हे दुसरे सरकार आहे. 23 नोव्हेंबर 2019 रोजी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शपथ घेतली होती. पण सर्वोच्च न्यायालयात या सरकारला आव्हान देण्यात आले होते. सर्वोच्च न्यायालयाने खुले मतदान घेण्याचा आदेश दिल्यावर दोघांनीही राजीनामा दिला होता. हे सरकार 80 तासांचे ठरले. आताही सर्वोच्च न्यायालयाने बहुमत चाचणीला स्थगिती देण्यास नकार दिल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राजीनामा दिला.


हेही वाचा – काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी औरंगाबादेत येऊन दाखवावं, इम्तियाज जलील यांचा इशारा