मला अडीच वर्षे सहकार्य केल्‍याबद्दल सर्वांचे धन्‍यवाद!

शेवटच्‍या मंत्रिमंडळ बैठकीत मुख्‍यमंत्री उद्धव ठाकरे हात जोडून झाले भावूक

आपले सरकार ५ वर्षे चालणार असल्याचे म्हटले होते, पण मला माझ्याच काही लोकांनी दगा दिला. त्याचे दुःख राहील. त्यांनी दगा दिल्यामुळेच आजची परिस्थिती ओढावली आहे. तिन्ही पक्षांनी मिळून उत्तम प्रकारे सरकार चालवले. अडीच वर्षे तुम्ही सर्वांनी मला खूप सहकार्य केले. त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार मानतो. या काळात माझ्याकडून काही चूक झाली असेल, कुणाला दुखावले असेल तर माफी मागतो.

आपण सर्व मिळून एकत्रितपणे कायदेशीर लढाईला सामोरे जाऊ, असे भावूक उद्गार काढत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी मंत्रिमंडळ बैठकीत आपल्या सर्व सहकार्‍यांचे आभार मानले. यावेळी एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे व्यथित झालेल्या मुख्यमंत्र्यांच्या वेदना पुन्हा एकदा प्रकर्षाने समोर आल्या. गुरुवारी होणार्‍या बहुमत चाचणीला सामोरे जाण्याआधीच उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार असल्याने त्यांची ही अखेरची मंत्रिमंडळ बैठक ठरली.

उद्धव ठाकरे सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास मंत्रिमंडळ बैठकीसाठी मंत्रालयात पोहचले. मंत्रालयात दाखल होताच छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेसमोर ते नतमस्तक झाले व महापुरुषांच्या प्रतिमांना अभिवादन करून बैठकीत सामील झाले. मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्र्यांनी मुख्य सचिवांसोबत इतर सचिव आणि अधिकार्‍यांचेही आभार मानले. बैठकीत औरंगाबाद, उस्मानाबाद आणि नवी मुंबई विमानतळाच्या नामांतरासोबतच महत्त्वाचे शैक्षणिक व सामाजिक प्रस्ताव त्यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळाने मंजूर केले. प्रस्ताव मंजूर झाल्यावर मंत्रिमंडळ बैठकीला उपस्थित काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचा निरोप घेऊन ते दालनातून बाहेर पडले. बाहेर पडताना उद्धव ठाकरे अतिशय संथगतीने परंतु धिरोदात्तपणे पावले टाकत होते. कधी हात उंचावून, तर कधी हात जोडत मंत्रालय परिसरात उपस्थित कर्मचार्‍यांचे आभार स्वीकारत होते. यावेळी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे आणि परिवहनमंत्री अ‍ॅड. अनिल परब उपस्थित होत

सुरक्षा कर्मचारी आणि निरोप देण्यासाठी खाली आलेल्या कर्मचार्‍यांच्या गराड्यातच प्रसारमाध्यमांना हात दाखवून ते आपल्या वाहनात बसले आणि सायंकाळी पावणेसातच्या सुमारास मातोश्रीच्या दिशेने रवाना झाले.

मुख्यमंत्र्यांनी वेगवेगळ्या विचारसरणीच्या तीन पक्षांनी एकत्र येऊन काम करत असताना केलेल्या सहकार्याबद्दल समाधान व्यक्त केले. दोन्ही पक्षांचे सहकार्य मिळाले, पण माझ्या पक्षाच्या काही लोकांनी दगा दिला हे दुर्भाग्य आहे. त्यांनी साथ दिली नाही याबद्दल दु:ख व्यक्त केले. माझ्याकडून कुणाचा अपमान झाला असेल किंवा कुणी दुखावले असेल तर माफी मागतो, असे मुख्यमंत्री मंत्रिमंडळाच्या बैठकीत म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी राजीनाम्याबाबत कोणतेही भाष्य केले नाही. सध्या हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले आहे. न्यायालयाने सांगितले तर गुरुवारी विश्वासदर्शक ठराव होईल. त्यानंतरच कळेल ही शेवटची बैठक आहे की नाही.
-जयंत पाटील, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी

मुख्यमंत्र्यांनी अडीच वर्षांत खूप चांगले काम केले हे सर्वांना माहिती आहे. कोरोनाचे संकट आणि त्यापाठोपाठ उद्धव ठाकरेंचे झालेले ऑपरेशन या सगळ्या परिस्थितीला ते मोठ्या धैर्याने सामोरे गेले. मणक्याच्या दुखण्यावर मात करून परतल्यावर त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता कामकाजाला सुरुवात केली. कोरोनाच्या कठीण काळात जगात इतर कुठल्याही नेत्याने इतके काम केले नसेल तेवढे उद्धव ठाकरेंनी केले. काँग्रेस हा सर्वांना सोबत घेऊन चालणारा पक्ष आहे. काँग्रेसने कधीही छत्रपतींच्या नावाला विरोध केलेला नाही. त्यामुळे काँग्रेसबद्दल द्वेष बाळगण्याचे कारण नाही. मनात काही द्वेष असेल तर काँग्रेस बाहेर राहून महाविकास आघाडीला सहकार्य करेल.
-सुनील केदार, पशुसंवर्धन मंत्री